"जेव्हा अतिरेक्यांनी कानपट्टीवर एके ४७ लावली..."; वाचा बॉर्डरलेस संस्थेच्या अधिक कदम यांचे रोमांचक अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 04:09 PM2019-01-17T16:09:37+5:302019-01-17T16:10:41+5:30
कोणत्याही संघर्षाच्या काळात स्त्रिया, मुलांचे विश्व उद्ध्वस्त होते.
औरंगाबाद : कोणत्याही संघर्षाच्या काळात स्त्रिया, मुलांचे विश्व उद्ध्वस्त होते. त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बळकट समाजनिर्मितीसाठी समाजाच्या भावी आईला सक्षम बनविले पाहिजे, असे आवाहन जम्मू-काश्मिरातील अतिरेक्यांनी उद्ध्वस्त केलेल्या नागरिकांच्या २३० मुलींना शिक्षण देणारे अधिक कदम यांनी बुधवारी येथे केले.
विवेकानंद महाविद्यालयात आयोजित विवेकानंद व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प जम्मू-काश्मिरातील बॉर्डरलेस संघटनेचे संस्थापक अधिक कदम यांनी गुंफले. ‘काश्मीरचे नवनिर्माण : नव्या नंदनवनाची शोधयात्रा’ या विषयावर कदम यांनी मार्गदर्शन केले. सुरुवातीला कदम यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर प्रा. दिलीप महालिंगे आणि प्राचार्य डॉ. श्याम शिरसाठ यांनी त्यांची मुलाखत घेतली. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्रीमंत शिसोदे होते. सूत्रसंचालन प्रा. अनिल लहाने यांनी केले.
यावेळी कदम यांनी त्यांचा जीवनपट उलगडून दाखवला. २२ वर्षांपूर्वी काश्मिरात एक घटना घडली. तेव्हा मित्रांसह २४०० रुपये घेऊन जम्मूत पोहोचलो. अनेक मित्र होते. मात्र आम्हाला जम्मू ओलांडून काश्मिरात जाता आले नाही. माझ्यासह तीन मित्र होते. बाकीचे गावी परतले. तेव्हाच ठरविले की, अतिरेकी कोणाच्या तरी घराला उडवतात. तेव्हा त्या कुटुंबातील सदस्यांसाठी, मुलींसाठी काम केले पाहिजे. सोबत घेऊन गेलेल्या २४०० रुपयांपैकी ७०० रुपये खर्च झाले. अनेक घरांमध्ये राहण्याचा योग आला. मात्र सुरुवातीला अनेकांना वाटे हा खबऱ्या असावा. यातून हाकलून दिले तरीही जिद्द सोडली नाही.
काही चांगले लोकही भेटले. त्यांनी घरात आसरा दिला. तेव्हापासून आजपर्यंत एक रुपयाही खर्च करावा लागला नाही. बॉर्डरलेस संस्थेची उभारणी केली. अनेक मदतीचे हात पुढे आले. यातून हे कार्य घडत गेले. आतापर्यंत अतिरेक्यांच्या हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील ११३ मुलींना शिक्षण देऊन लग्न लावून दिले. सध्या २३० मुलींना शिक्षण देणे सुरू आहे. अतिरेक्यांनी आई-वडिलांना मारल्यानंतर मागे उरलेल्या मुलींची काहीही चूक नसते. त्यांची जिम्मेदारी घेतली. सांभाळ केला. सकारात्मक वागून त्यांच्यात दिसणारी भविष्यातील आई उभी करायची आहे. ते कार्य करतो, असेही अधिक कदम यांनी सांगितले.
प्रा. महालिंगे यांनी कदम यांना अतिरेक्यांनी १९ वेळा पकडले तेव्हा काय वाटले? असा प्रश्न विचारला. तेव्हा कदम म्हणाले, मी हिमालयात साधना करायला गेलो आहे. त्यात कितीही अडथळे आले तरी ती साधना संपणार नाही. एक वेळा एके ४७ गणची नळी कानपट्टीवर लावली होती. तेव्हा डोळे मिटून घेतले. मात्र त्या अतिरेक्यात काय सकारात्मक बदल झाला माहीत नाही. पण त्यांनी मारले नाही. असे अनेक प्रसंग घडले. मुळात तुम्ही निखळ असाल ना तर संकट टळते, याची अनुभूती वारंवार आली. यातूनच घडत गेलो, असेही कदम यांनी सांगितले.
सीमारेषा माणसाच्या अहंकाराचे प्रतीक
सीमारेषांनी देशातील संबंध बिघडतात का, या प्रश्नावर ते म्हणाले, माणसाच्या विकृतीचे, अहंकाराच्या प्रतीक आहेत. १९४७ नंतर अनेक कुटुंब सीमेपलीकडे जाऊ शकले नाहीत. मात्र अनेकांनी लग्नाचा आनंद साजरा केला. यातून देशाच्या सीमारेषा या लोकांच्या मनामध्ये असलेल्या सीमा घालवू शकत नाही हे स्पष्ट होते. मुंबईसारख्या शहरावर हल्ला होतो. हे सीमांमध्ये विश्वास याचेच लक्षण असल्याचेही अधिक कदम यांनी सांगितले.