औरंगाबादमध्ये वंदे मातरम् सुरु असताना एमआयएमच्या नगरसेवकांनी सोडले सभागृह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 03:40 PM2017-09-19T15:40:33+5:302017-09-19T15:52:55+5:30
औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वंदे मातरम् सुरु असताना एमआयएम् गटनेता नासेर सिदीकी, नगरसेविका समीना शेख, नगरसेवक जफर शेख यांनी सभागृह सोडले.
औरंगाबाद, दि. 19 - औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वंदे मातरम् सुरु असताना एमआयएम् गटनेता नासेर सिदीकी, नगरसेविका समीना शेख, नगरसेवक जफर शेख यांनी सभागृह सोडले. वंदे मातरम् संपल्यावर ते सर्व सभागृहात परत आले. यावर प्रसार मध्यमाशी बोलताना समीना शेख, सैयद मतीन यांनी आमचा धर्म मान्यता देत नाही या पुढे आम्ही वंदे मातरम् सुरु असताना बाहेर जाणार असे सांगितले. सारे जहाँ से अच्छा हे गीत घ्या अशी मागणी त्यांनी केली.
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 'वंदे मातरम्' म्हणण्यावरुन वाद झाला होता. एमआयएमच्या नगरसेवकांनी 'वंदे मातरम्' म्हणण्यास विरोध केल्याने मनपाच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला होता.
औरंगाबाद महापालिकेच्या सभागृहात एमआयएमच्या नगसेकांनी 'वंदे मातरम्' म्हणण्यास विरोध केल्यानं यावेळी शिवसेना-भाजपाचे नगरसेवक आक्रमक झाले. एमआयएमचे नगरसेवक व शिवसेना-भाजपाच्या नगरसेवकांमध्ये राडा देखील झाला तसेच एमआयएमचे नगरसेवक व युतीच्या नगरसेवकांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू करत गोंधळ घातला होता.
सर्वसाधारण सभेत नेमके काय घडले
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ' वंदे मातरम्' सुरू असताना बसून राहिलेल्या एमआयएम व काँग्रेसच्या दोन नगरसेवकांना निलंबित करण्यासाठी शिवसेना व भाजपा यांनी आक्रमक पवित्रा घेत सभेत गोंधळ घातला. अखेर महापौरांनी एमआयएमचे सय्यद मतीन व काँग्रेसचे सोहेल शेख या दोघांचे एक दिवसासाठी निलंबन केले आहे.
'वंदे मातरम्' म्हणण्याला विरोध दर्शवण्यासाठी एमआयएमचे सय्यद मतीन व काँग्रेसचे सोहेल शेख हे नगरसेवक सर्वसाधारण सभेत 'वंदे मातरम्' सुरू असताना बसून राहिले होते. यावर शिवसेना व भाजप सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दोन्ही नगरसेवकांना निलंबित करण्याची मागणी करत युतीच्या सदस्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. या गदारोळानंतर शेवटी महापौर भगवान घडामोडे यांनी सय्यद मतीन व सोहेल शेख या दोन्ही नगरसेवकांना एक दिवसासाठी निलंबित केले.
वंदे मातरम् कदापि म्हणणार नाही - अबू आझमी
दरम्यान, काही दिवसांपूर्वी तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रातही ‘वंदे मातरम’ म्हणण्याची सक्ती करण्याच्या मुद्यावरून नव्या वादाला तोंड फुटले होते. ‘आम्हाला देशातून बाहेर काढलं तरी चालेल, पण आम्ही कधीही वंदे मातरम म्हणणार नाही’, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले होते.
मद्रास हायकोर्टाने तामिळनाडूतील सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांमध्ये आठवड्यातून किमान एकदा वंदे मातरम् म्हणण्याची सक्ती केली आहे. महाराष्ट्रातही तशी सक्ती लागू करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी पत्रकारांना सांगितले होते.