जेव्हा गावचे कारभारीच थकवितात लाखोंचा कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:07 AM2021-01-03T04:07:12+5:302021-01-03T04:07:12+5:30
कैलास पांढरे केर्हाळा : गावाचा विकास हा गावप्रमुखाच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो. त्याचे वागणे हे गावावर प्रभाव टाकत असते; मात्र ...
कैलास पांढरे
केर्हाळा : गावाचा विकास हा गावप्रमुखाच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो. त्याचे वागणे हे गावावर प्रभाव टाकत असते; मात्र केर्हाळा गावात अजबच प्रकार समोर आला आहे. गेल्या पाच वर्षांपासून गावाचे कारभारी म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्यांनीच विविध प्रकारचा कर भरणा केला नाही. त्यामुळे कारभारीच असे वागले असतील तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लोकासांगे ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण असे म्हटले जाते. गावाचा कारभार चालविताना गावप्रमुखाचा आदर्श गावकरी घेत असतात. मात्र, जर कारभारीच चुकीचे वागू लागले तर त्याचा परिणाम गावाच्या व्यवस्थेवर पडतो. हे अगदी सत्य आहे. असाच काहीसा अजब कारभार हा सिल्लोड तालुक्यातील केर्हाळा गावात घडल्याचे समोर आले. केर्हाळा गावच्या सदस्यांनीच ग्रामपंचायतचा विविध प्रकारचा कर भरलाच नाही. तर काही सदस्यांनी अवेळी भरला तो ही अर्धवटच.
गेल्या पाच वर्षांपासून गावाचा कारभार चालविणारे आणि नव्याने होत असलेल्या निवडणुकीत गावचे कारभारीपद आपल्या हाती यावे म्हणून स्वप्न बाळगणारे उमेदवार, माजी ग्रामपंचायत सदस्यांनी विविध प्रकारचा कर भरणाच केला नाही. कारभाऱ्यांचीच अशी वृत्ती गावाच्या विकासाला अडसर ठरली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी तरी का म्हणून कर भरणा केला पाहिजे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
केर्हाळा ग्रामपंचायत ही तेरा सदस्यांची आहे. २१ ते ३० डिसेंबर २०२० या नऊ दिवसांच्या कालखंडात विविध सेवा कराची २ लाख ३२ हजार चारशे तेवीस रुपये वसुली झाली आहे. ग्रामपंचायत अंतर्गत दिवा, आरोग्य, पाणी, स्वच्छता या सारख्या विविध प्रकारच्या सेवेतून जमा होणारी रक्कम ही गावाच्या विविध विकासकामांसाठी वापरली जाते. जर कर वसुली वेळेवर योग्य पद्धतीने झाली नाही तर गावातील सर्वच कामकाजावर त्याचा परिणाम होतो. तर कर्मचाऱ्यांचा पगार ऱखडला जातो.
--------
ग्रामस्थांनाच का वेठीस धरता
सर्वसामान्य नागरिकांचे कोणतेही छोटे मोठे काम ग्रामपंचायतीकडे पडले की लगेच त्या लोकांची कर वसुली डायरी बाहेर काढली जाते. ज्याप्रमाणे गावातील सर्वसामान्य व्यक्तीकडून कर गोळा केला जातो. तशीच गावकारभाऱ्यांकडून सक्तीची वसुली का केली जात नाही. असा प्रश्न गावकरी विचारू लागले आहेत.
------
प्रशासनाने अपात्र ठरवावे
जर कुठलाही ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतीचा सेवा कर एक वर्षापेक्षा अधिक काळ थकीत ठेवत असेल तर प्रशासनाने अशा ग्रामपंचायत सदस्यास अपात्र ठरवावे. ज्यामुळे गावाचा विकास होईल. आणि गावाला शिस्त देखील लागेल.
- सूर्यभान बन्सोड, केर्हाळा