पाणी प्रश्न पेटला असताना महानगरपालिका आयुक्त रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 07:14 PM2019-04-23T19:14:04+5:302019-04-23T19:17:25+5:30
आयुक्त सुटीवर गेल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद : शहरात पाणीप्रश्न पेटलेला असताना महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक हे आठ दिवसांच्या रजेवर चालले आहेत. डॉ. विनायक नांदेड येथून लॉ अभ्यासक्रमाची परीक्षा देत आहेत. मागील वर्षीप्रमाणे यंदाही ते आठ दिवसांच्या दीर्घ सुटीवर मंगळवारपासून रवाना होणार आहेत. २४ एप्रिल ते २ मेदरम्यान आयुक्त सुटीवर असल्याने अतिरिक्त पदभार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आला. शहरात पाणी प्रश्न गंभीर बनला असताना आयुक्त सुटीवर गेल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
शहरात पाणीटंचाईचा प्रश्न आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने प्रशासकीय पातळीवरील निणर्य घेण्याचे अधिकार आयुक्तांकडे आहेत. आयुक्त डॉ. निपुण हे सुटीवर जात असल्याने प्रशासकीय कामाची घडी पुन्हा विस्कटण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वीही आयुक्तांनीलॉ अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी सहा महिन्यांपूर्वी १८ ते २८ आॅक्टोबरदरम्यान दहा दिवसांची सुटी घेतली होती. त्यावेळी प्रभारी म्हणून जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडेच कार्यभार सोपविला होता. या काळात एकदाही चौधरी पालिकेत आले नाहीत.
तसेच धोरणात्मक व वादग्रस्त निर्णयाच्या संचिकाही त्यांनी बाजूला ठेवल्या होत्या. त्यामुळे पालिकेतील कचरा प्रक्रिया प्रकल्पांसह आवश्यक कामेही खोळंबली होती.आता पुन्हा आयुक्त सुटीवर जात असल्याने या काळात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी व्यस्त आहेत.
निवडणुकीनंतर बदली?
आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना यापूर्वीच शासनाने सचिवपदाचा दर्जा बहाल केला आहे. तेव्हापासून ते औरंगाबाद पालिकेतून बदलीसाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. येथील कचरा व पाणी प्रश्न सोडविण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी नगरविकास विभागाकडे बदलीची मागणी केल्याचे बोलले जात आहे. सुटीवरून आयुक्त परत येतील किंवा नाही यावर साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. आयुक्तांच्या बदलीसाठी सेना-भाजप युतीचे दोन आमदार अलीकडेच सरसावले होते. मतदान होताच त्यांची बदली होईल, असाही कयास लावण्यात येत आहे.
रोम शहर जळत असताना...
महापालिकेत महापौर म्हणजे अर्जुन आहेत. त्याचे सारथी म्हणून आयुक्त काम पाहतात. शहरात पाणीटंचाईमुळे गंभीर परिस्थिती आहे. संकटाचा सामना करण्याऐवजी आयुक्त सुटीवर निघून जातात...कृष्णाने युद्धात अर्जुनाला सोडून देण्यासारखा हा प्रकार आहे. रोम शहर जळत असताना राजा निनो बासरी वाजवत होता...असा हा प्रकार आहे. आयुक्त नेहमीच जबाबदारी झटकून पळून जातात. मोबाईल डायव्हर्ट करून ठेवणे, फोन न उचलणे हे कशाचे लक्षण आहे.
- दामूअण्णा शिंदे, माजी नगरसेवक