औरंगाबादला अखंडित वीज कधी मिळणार? दुरुस्ती-बिघाडाच्या नावाखाली अचानक होते गूल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 12:53 PM2022-09-16T12:53:15+5:302022-09-16T12:54:10+5:30
औद्योगिक, शैक्षणिक आणि वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाचे शहर दुर्लक्षित
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद :औरंगाबाद हे आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर असलेले ऐतिहासिक शहर आहे. मराठवाड्याचे मुख्यालय असताना औरंगाबादला अखंडित वीज का मिळत नाही? असा प्रश्न शहरवासीयांकडून विचारला जात आहे. शासनाकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत. परिणामी, २४ तासांत किमान एकदा तरी वीज ‘गूल’ होत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. त्यामुळे महावितरणच्या कारभाराला अक्षरश: नागरिक कंटाळले आहेत.
वीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखण्यासह वीज जाण्याची पूर्वसूचना ग्राहकांना मिळालीच पाहिजे. यासाठी यंत्रणा अधिक कार्यक्षम बनवा, असे आदेश तत्कालीन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नुकतेच दिले आहेत. परंतु औरंगाबादेत या आदेशाकडे दुर्लक्ष केलेच जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे अचानक वीज गूल होण्याचा 'शॉक' नागरिकांना दिला जात आहे.
शहरात अचानक वीजपुरवठा खंडित होणे, हे शहरात नित्याचेच झाले आहे. कधी दुरुस्तीच्या नावाखाली, तर कधी बिघाडाच्या नावाखाली वीज गूल होत आहे. त्यामुळे महावितरणच्या या अजब कारभाराने शहरातील नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पावसाने हजेरी लावताच वीज जातेच, मात्र, पाऊस नसतानाही वीज का जातेय? असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वसुलीवरच भर
महावितरणच्या शहर मंडळांतर्गत छावणी, पावर हाऊस , हर्सूल, शहागंज, सिडको, चिकलठाणा, गारखेडा, क्रांती चौक या उपविभागांमधील घरगुती ग्राहकांनी अनेक महिन्यांपासून वीज देयकाचा भरणा न केल्याने मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येते. थकीत बिल असणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई हाती घेण्यात आली. थकीत वीजबिलाची वसुली करा, मात्र, अखंड वीजपुरवठा होण्यासाठी जुनाट यंत्रणा अद्ययावत करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
औरंगाबाद शहरातील वीजग्राहक
- घरगुती- २,९७,२६३
- व्यावसायिक-३५,०९३
- औद्योगिक- ६,५२६
- दिवाबत्ती-१,५२५
- शेतीपंप-२,१३२
- उच्चदाब-६४२
- इतर २,२००
- पाणीपुरवठा-४६
- महिन्यांचे वीज बिलिंग-सुमारे १६८ कोटी रुपये.
- ग्राहकांकडे ८८ कोटी रुपयांची थकबाकी.