सौर कृषिपंप योजनेला मुहूर्त लागेना; महावितरणकडून सलग तीन वर्षांपासून होतेय शेतकऱ्यांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 02:01 PM2019-05-06T14:01:17+5:302019-05-06T14:04:16+5:30

अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्यामुळे महावितरणसमोर ही योजना राबविण्याबाबत पेच निर्माण झाला आहे.

When will be Solar engine scheme started; Mahavitaran's delay from last three consecutive years | सौर कृषिपंप योजनेला मुहूर्त लागेना; महावितरणकडून सलग तीन वर्षांपासून होतेय शेतकऱ्यांची थट्टा

सौर कृषिपंप योजनेला मुहूर्त लागेना; महावितरणकडून सलग तीन वर्षांपासून होतेय शेतकऱ्यांची थट्टा

googlenewsNext

- विजय सरवदे 

औरंगाबाद : मराठवाड्यातील तब्बल ७५ हजार  शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेंतर्गत वीजजोडणीसाठी आॅनलाईन नोंदणी केली खरी; परंतु अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्यामुळे महावितरणसमोर ही योजना राबविण्याबाबत पेच निर्माण झाला आहे. हजारो शेतकऱ्यांचे किरकोळ कारणामुळे अर्ज नाकारले जातात, तर ज्यांचे अर्ज वैध झालेले आहेत, त्यांना कोटेशन दिले जात नाही. परिणामी, सलग तीन वर्षांपासून वीजजोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये महावितरणच्या अशा ढिसाळ कारभाराबद्दल असंतोष पसरला आहे. 

शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना अस्तित्वात आली. या योजनेचे आॅक्टोबर २०१८ मध्ये मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनही केले. मात्र, आजपर्यंत ही योजना प्रत्यक्षात शेतापर्यंत पोहोचलेली नाही. ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांनी वीजजोडणीचे पैसे भरलेले आहेत; पण त्यांची वीजजोडणी प्रलंबित आहे, अशा शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे मराठवाड्यातील तब्बल ७५ हजार शेतकऱ्यांनी या योजनेंतर्गत वीजजोडणीसाठी आॅनलाईन अर्ज केले. यापैकी किरकोळ कारणास्तव २१ हजार शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले असून, अवघ्या १३ हजार शेतकऱ्यांना कोटेशन देण्यात आले. यापैकी  ७३२५ शेतकऱ्यांनी वीजजोडणीसाठी महावितरणकडे पैसेही भरले. मात्र, आचारसंहितेचे कारण पुढे करीत प्रत्यक्ष कार्यवाही करण्यासाठी महावितरणचे अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शेतकऱ्यांना वर्षभरापूर्वी ‘एचडीव्हीएस’ योजनेंतर्गत वीजजोडणी देण्याचे महावितरणने सांगितले; परंतु या योजनेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे ही योजना वर्षभर रखडली.

पुढे या योजनेंतर्गत सर्वेक्षण सुरू झाले. तेव्हा विद्युत वाहिनीपासून ६०० मीटर परिघातील दोन किंवा तीन शेतकऱ्यांना एका ट्रान्सफॉर्मरवरून वीज देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, काही शेतकऱ्यांच्या बांधापासून काही ठिकाणी १ किंवा २ किलोमीटर अंतरावर ‘एचडीव्हीएस’ची विद्युत वाहिनी असल्यामुळे अशा शेतकऱ्यांना ‘एचडीव्हीएस’ ऐवजी सौर कृषिपंप योजनेंतर्गत वीजजोडणी देण्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार सौर कृषिपंपासाठी अर्ज केलेल्या अनेक शेतकऱ्यांना आता कोटेशन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यासंदर्भात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली, तर आचारसंहितेच्या नावाखाली ते बोलण्यास टाळत आहेत.

केवळ वीजजोडणीअभावी जळताहेत बागा
‘लोकमत’कडे यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात आडूळ येथील शेतकरी अशोक वाघ यांनी सांगितलेली व्यथा अशी, वीजजोडणीसाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना गेल्या वर्षी ‘एचडीव्हीएस’ योजनेत वीजजोडणी दिली जाईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ४त्यानंतर सांगितले की, तुम्ही सौर कृषिपंप योजनेसाठी अर्ज करा. आम्ही आॅनलाईन अर्ज केले. कोटेशन मागण्यासाठी गेलो, तर आता अधिकारी म्हणतात, तुम्हाला आपोआप सौर कृषिपंपाची जोडणी मिळेल. आजपर्यंत आम्हाला ना ‘एचडीव्हीएस’ योजनेतून कनेक्शन मिळाले, ना सौर कृषिपंप योजनेतून. आमच्या हातातोंडाला आलेल्या आंबे, मोसंबीच्या बागा पाण्याअभावी जळून जात आहेत.

Web Title: When will be Solar engine scheme started; Mahavitaran's delay from last three consecutive years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.