पुंडलिकनगरमधील गुंडगिरी, नशेखोरीला आळा कधी घालणार ? रहिवाशांचा संताप अनावर
By सुमित डोळे | Published: November 13, 2023 04:49 PM2023-11-13T16:49:22+5:302023-11-13T16:50:05+5:30
पोलिस आयुक्तालयावर संतप्त शेकडो रहिवाशांचा मोर्चा
छत्रपती संभाजीनगर : शेजाऱ्यांमधील वादात मद्यस्थीसाठी गेलेल्या गणेश मारुती राऊत (२८, रा. साईनगर, गारखेडा) या तरुणाची ७ नोव्हेंबर रोजी निर्घृण हत्या झाली. या हत्येला पुंडलिकनगरमधील वाढलेली गुंडगिरी, नशेखोरीची किनार असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पुंडलिकनगरच्या शेकडो रहिवाशांनी शनिवारी दुपारी १२ वाजता पोलिस आयुक्तालयावर धडक मोर्चा काढत गुंडगिरीवर आळा कधी घालणार, असा संतप्त प्रश्न केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर रहिवासी परतले.
६ नोव्हेंबर रोजी गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर रस्त्यावरील वाइन शॉपसमोर तरुणाच्या हत्येचा प्रयत्न झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ७ नोव्हेंबर रोजी गुरूदत्तनगरात गणेशची सागर विक्रम केसभट व शुभम मदन राठोड यांनी हत्या केली. या घटनेनंतर पुंडलिकनगर परिसर पुन्हा दहशतीखाली गेला. हत्येनंतर अटक केलेल्या सागरच्या खिशात नशेच्या गोळ्या आढळल्या. दोन गंभीर गुन्हे दाखल असलेला सागर अनेक वर्षांपासून पुंडलिकनगरमधील गुन्हेगारांच्या टोळ्यांच्या संपर्कात असल्याचेही निष्पन्न झाले.
शहरात याच परिसरात गेली ५ वर्षांमध्ये खून, खुनाच्या प्रयत्नांच्या घटनांनी उच्चांक गाठला. शहरातील १७ पोलिस ठाण्यांमध्ये पुंडलिकनगरमध्ये गंभीर गुन्ह्यांचा आलेख सर्वाधिक राहिला. याला वाढती नशेखोरी, पुंडलिकनगर पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांचे गुन्हेगारांसोबत असलेले ''हितसंबंध'' व त्यामुळे गावगुंडांचा वाढलेला आत्मविश्वास कारणीभूत असल्याचे स्थानिक सांगतात. या गुन्हेगारांचे ठरावीक अड्डे आहेत. व्यावसायिकांनाही याचा मोठा त्रास होतो. मात्र, तक्रार केली की ठाण्यातीलच काही पोलिस कर्मचाऱ्यांकडूनच संबंधित गुंडांना तक्रारदारांची नावे कळतात, असे स्थानिकांनी सांगितले. घटनेनंतर संपर्क साधल्यावरही स्थानिक पोलिस प्रतिसाद देत नाहीत, घटनास्थळी वेळेत येत नाहीत, असा गंभीर आरोप मोर्चातील स्थानिकांनी उपायुक्त नितीन बगाटे, सहायक आयुक्त धनंजय पाटील यांच्यासमोर केला. यापुढे गावगुंडांवर आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करू, पोलिसांना सूचना करू, असे आश्वासन त्यांना देण्यात आले.