सरकारी रुग्णालये कधी होणार ‘फिट’? सरकार, थोडं निधी, सोयी-सुविधांचे बळ द्या

By संतोष हिरेमठ | Published: October 16, 2023 03:04 PM2023-10-16T15:04:34+5:302023-10-16T15:05:31+5:30

कार्यरत डाॅक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांकडून रुग्णसेवेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा

When will government hospitals be 'fit'? Govt, give some funds, strength of facilities | सरकारी रुग्णालये कधी होणार ‘फिट’? सरकार, थोडं निधी, सोयी-सुविधांचे बळ द्या

सरकारी रुग्णालये कधी होणार ‘फिट’? सरकार, थोडं निधी, सोयी-सुविधांचे बळ द्या

छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी), शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्ह्यातील उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये गोरगरीब रुग्णांच्या आरोग्यासाठी जीवनदायी ठरत आहेत. येथे कार्यरत प्रत्येक डाॅक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांकडून रुग्णसेवेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. मात्र, अपुरा निधी, अपुरे मनुष्यबळ आणि अपुऱ्या सोयीसुविधांचा फटका रुग्णांना बसतो. याकडे शासनाने थोडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

१) घाटीत क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण घाटीत १,१७७ खाटा मंजूर आहेत. प्रत्यक्षात दररोज त्यापेक्षा २ हजारांच्या घरात रुग्ण दाखल असतात. या संख्येनुसार खाटा मंजूर होण्याची आणि त्यानुसार मनुष्यबळ, सोयीसुविधा वाढीची प्रतीक्षाच करावी लागत आहे. जानेवारी ते ऑगस्ट या ८ महिन्यांच्या कालावधीत ओपीडीत तब्बल ३ लाख ३ हजार ६८९ रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर आयपीडीत ३५ हजार ६१० रुग्णांवर उपचार केले. दररोज १७१ रुग्ण भरती होतात. रुग्ण गंभीर झाला की पाठवा घाटीत घाटीत सीटी स्कॅन, एमआरआय, आयसीयू, एमआयसीयू, एनआयसीयू, टीआयसीयू, कॅथलॅब, टुडी इको, मेमोग्राफी, व्हेंटिलेटर्स इ. सुविधा आहेत. खासगी रुग्णालये असो वा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत असलेली रुग्णालये, एखादा रुग्ण गंभीर झाला की, घाटीत पाठविण्यात येतो. घाटी परिसरात १५ औषधी दुकाने घाटी रुग्णालयात आजघडीला औषधसाठा पुरेसा असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, घाटी परिसरात रस्त्याच्या दुतर्फा जवळपास १५ औषधी दुकाने आहेत. ही औषधी दुकाने कोणाच्या भरवशावर सुरू आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो. सध्या औषधसाठा पुरेशी असल्याचा दावा केला जातो. परंतु, ही परिस्थिती कायम राहणार का, असाही सवाल उपस्थित होतोय. मागणीपेक्षा कमीच निधी घाटी रुग्णालयाला मागणीपेक्षा कमीच निधी मिळत असल्याची परिस्थिती आहे. 

२०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी रुग्णालयातील वेतन आणि इतर बाबींसाठी १८७.८९ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात १६२.७८ कोटींचा निधी प्राप्त झाला. अपुऱ्या निधीमुळे अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. पाणी विकत घेण्याची वेळ घाटीत रुग्णांच्या नातेवाइकांना पाणी विकत घ्यावे लागत असल्याची परिस्थिती आहे. त्यासाठी पाणी विकण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने परवानगीच दिलेली आहे. नातेवाइकांना थांबण्यासाठी शेड बांधण्यात आलेली आहे. ही जागा अपुरी पडत असल्याने ठिकठिकाणी जमिनीवरच नातेवाइक आसरा घेतात. या परिसरातही अस्वच्छता पाहायला मिळाली.

औषधसाठा भरपूर 
मराठवाड्यासह खान्देश, विदर्भातील रुग्ण उपचारासाठी घाटीत येतात. अपघातग्रस्त रुग्णही येथेच येतात. या सगळ्याला समर्थपणे पेलून घाटी रुग्णालय रुग्णसेवा देत आहे. औषधसाठा भरपूर आहे. टीआयसीयू, एमआयसीयू अशा ठिकाणी औषधांचा पुरवठा कधीही कमी पडू दिला जात नाही.
-डाॅ. संजय राठोड, अधिष्ठाता, घाटी

२) अपुऱ्या सोयी-सुविधांनी ‘डेंटल’ला दातदुखी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या काही कालावधीत विद्यार्थीसंख्येत वाढ झाली. मात्र, त्या तुलनेत सोयीसुविधा वाढीची नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय हे १०० डेंटल चेअरचे आहे. मात्र, आजघडीला याठिकाणी ९० डेंटल चेअरवरच रुग्णांचे दंतोपचार सुरू आहेत. १० डेंटल चेअरची कमरता आहे. डेंटल चेअरची खरेदी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येते. औषधी बाहेरूनच घेण्याची वेळ शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात औषधालयच नाही. त्यामुळे दातदुखीवर औषधी घ्यायची असेल तर ती मेडिकलमधूनच खरेदी करावी लागत असल्याची परिस्थिती आहे. पेनकिलर, अँटिबायोटिक अशी औषधी मेडिकलवरूनच रुग्णांना खरेदी करावी लागतात. रोज किती रुग्ण? या ठिकाणी रोज ३०० ते ३५० नवीन रुग्ण दंतोपचारासाठी येतात, तर जवळपास २०० जुने रुग्ण फाॅलोअपला येतात. रुग्णसंख्या वाढत असल्याने उपचारासाठी रुग्णांना तारखाही द्याव्या लागत आहेत. लाइट गेली की उपचार थांबतात गेल्या वर्षभरापासून याठिकाणी जनरेटर मिळण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे लाइट गेली की, उपचार थांबतात. रुग्णालयातील विद्युतीकरणाच्या कामात जनरेटर मिळेल, असेच सांगितले जाते.

प्रस्ताव सादर 
औषधालयाचा प्रस्ताव शासनाला देण्यात आला आहे. औषधालयासाठी फार्मासिस्टचे पद लागेल. ३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच डेंटल चेअर मिळतील. विद्यार्थ्यांच्या वाढलेल्या संख्येनुसार सोयीसुविधा वाढविण्याचाही प्रस्ताव दिलेला आहे. डेंटल मटेरियल खरेदीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
-डाॅ.माया इंदूरकर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय


३) रुग्णांच्या रांगा वाढल्या, सुविधा कधी वाढणार?
सार्वजनिक आरोग्य विभागाने १५ ऑगस्टपासून जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयात नि:शुल्क रुग्णसेवेला सुरुवात केली. त्यामुळे रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, अनेक पदे रिक्त आहेत. शिवाय वाढलेल्या रुग्णसंख्येनुसार सोयीसुविधा मिळण्याची प्रतीक्षा आहे. जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यात ३ उपजिल्हा रुग्णालये आणि १० ग्रामीण रुग्णालये आहेत. मोफत सेवेमुळे जिल्हा रुग्णालयातील ओपीडीतील रुग्णसंख्या सहाशेवरून १,६०० पर्यंत गेली. त्यामुळे नोंदणी कक्षापासून तर सोनोग्राफी, एक्सरे, सीटी स्कॅन, रक्त तपासणीसाठी रुग्णांच्या लांब रांगा लागत आहे. उपचारासाठी रुग्णांना ताटकळावे लागत आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे स्वच्छतेच्या कामावरही परिणाम होतो. इमारतीचीही ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे.

जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयातील मनुष्यबळ
पद-- मंजूर- भरलेली- रिक्त वर्ग-१ -- १९-११-८ वर्ग-२--३२-२९-३ वर्ग-२ गट: ब --२-२-० वर्ग-३-- २१५-१६२-५३ वर्ग-४ --७७-४४-३३ एकूण -३४५-२४८-९७

औषधे आणि सोयीसुविधांची मागणी
वाढीव सुविधांची मागणी जिल्हा रुग्णालयात दोन महिने पुरेल इतका औषधसाठा आहे. रुग्णसंख्या वाढली आहे. वाढीव रुग्णसंख्येनुसार औषधे आणि सोयीसुविधांची मागणी करण्यात आली आहे. 
-डाॅ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: When will government hospitals be 'fit'? Govt, give some funds, strength of facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.