२३ लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कधी देणार धान्य? मराठवाड्यात जुलैपासून बंद आहे पुरवठा
By विकास राऊत | Published: December 13, 2022 05:04 PM2022-12-13T17:04:49+5:302022-12-13T17:06:02+5:30
याबाबत सरकार केव्हा घेणार निर्णय?
औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आठ जिल्ह्यांतील ५ लाख २७ हजार ४०० कार्डांवरील २३ लाख ३१ हजार १०० शेतकऱ्यांना देण्यात येणारे गहू व तांदूळ धान्याचे वितरण जुलैपासून हळूहळू बंद करण्यात आले आहे. सहा वर्षांपासून विभागातील शेतकरी ओल्या व कोरड्या दुष्काळाचा सामना करीत असताना शेतकऱ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.
याबाबत सरकारने अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. २०१३ मध्ये देशात अन्न सुरक्षा कायदा लागू झाला. २०१५ साली हा कायदा राज्यात लागू झाला. यातून अंत्योदय अन्न योजना आणि एपीएल शेतकरी गटाला धान्य देण्याची तरतूद करण्यात आली. शेतकरी कुटुंबातील प्रति व्यक्तीला ५ किलो धान्य वितरित केले जात होते. दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ वाटप जुलै महिन्यापर्यंत केले गेले. परंतु जुलै महिन्यापासून गहू आणि पुढे सप्टेंबरपासून तांदूळ शेतकऱ्यांच्या पदरी पडला नाही. एकीकडे शेतकरी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे हवालदिल झालेला आहे. त्यातच शासनानेदेखील धान्य देणे थांबविले आहे.
मराठवाड्यातील कार्डधारक शेतकरी व लाभार्थी असे.....
जिल्हा...............कार्डसंख्या.................लाभार्थी
औरंगाबाद .........७४ हजार ४९-------३ लाख ४२ हजार ३९८
बीड ................१ लाख ३५ हजार ३३ ----५ लाख ५० हजार १५४
हिंगोली.............. ३७ हजार ७६३---- १ लाख ६८ हजार ४८१
जालना ...............२९ हजार ४०३ ----१ लाख ३२ हजार ५९७
लातूर ................५७ हजार २३२----- २ लाख ७४ हजार ५८६
नांदेड .................८८ हजार ६८० ---- ३ लाख ६५ हजार ५९३
उस्मानाबाद......... ५२ हजार ८४७ ----२ लाख ६४ हजार ४९८
परभणी................ ५२ हजार ३९३-----२ लाख ३२ हजार ७९३
एकूण.................. ५ लाख ३७ हजार ४०० ........२३ लाख ३१ हजार १००