मी कर्जमाफीचा लाभार्थी होणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:55 AM2017-11-14T00:55:12+5:302017-11-14T00:55:15+5:30
त्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र मोजक्याच शेतक-यांची नावे ग्रीन यादीत दिसत आहेत. मात्र, पिवळ्या (येलो) आणि लाल (रेड) यादीतील नावे शोधायची कुठे हा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र मोजक्याच शेतक-यांची नावे ग्रीन यादीत दिसत आहेत. मात्र, पिवळ्या (येलो) आणि लाल (रेड) यादीतील नावे शोधायची कुठे हा प्रश्न शेतक-यांना पडला आहे. बँकेतही योग्य माहिती मिळत नसल्याने कर्जमाफीचा हा गोंधळ किती दिवस सुरु राहणार, असा सवाल शेतक-यांना उपस्थित केला जात आहे. एकूणच मी कर्जमाफीचा लाभार्थी होणार तरी कधी, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.
कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख पंधरा हजार कुटुंबातील तीन लाख ९७ हजार शेतक-यांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. बँकांनाही आपल्याकडील कृषी कर्जदार शेतक-यांची संपूर्ण आॅनलाईन भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी तीन लाख १२ हजार शेतक-यांची माहिती आॅनलाईन भरली. त्यानुसार ग्रीन यादीत कर्जमाफीस तात्पुरते पात्र, येलो यादीत अर्ज भरताना कागदपत्रातील त्रुटींमुळे प्रलंबित शेतकºयांची नावे, तर रेड यादीत कर्जमाफीस तात्पुरते अपात्र शेतकºयांची नावे असतील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, येलो आणि रेड यादी ‘आपले सरकार’च्या वेबपोर्टलवर, तालुका समिती किंवा बँकेत कुठेच पाहायला उपलब्ध नाही. त्यामुळे काही कर्जमाफीस पात्र होण्यासाठी कमी असलेली कागदपत्रे कोणती, ती पाहायची कुठे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. कर्जदार शेतकरी संबंधित बँकेत गेल्यानंतर आमच्याकडे कर्जमाफीबाबत कुठलीच माहिती नाही, सर्व याद्या वरिष्ठ कार्यालयाकडून येणार असल्याचे उत्तर शेतकºयांना मिळत आहे. विशेष म्हणजे कर्जमाफीच्या संपूर्ण प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन केलेल्या तालुकानिहाय समित्यांच्या कामकाजाबाबत कुणालाच माहिती नाही. पात्र शेतक-यांची माहिती गावनिहाय देण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप एकाही गावात तालुका समितीचे सदस्य किंवा बँक प्रतिनिधी गेलेले नाही. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळणार तरी कधी, असा संतप्त सवाल शेतक-यांतून उपस्थित केला जात आहे. आतापर्यंत ज्या बँकांना पात्र शेतक-यांसाठी कर्जमाफीची रक्कम मिळाली आहे. ती किती शेतक-यांच्या खात्यावर वर्ग झाली. यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेतलेल्या शेतक-यांची संख्या किती आहे. याची अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाकडेही उपलब्ध नाही. दरम्यान, सर्व पात्र शेतक-यांची यादी एकाच वेळी जाहीर करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असून, बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांना याबाबत सूचना देण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक एन. व्ही. आघाव यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.