नंदीग्राम एक्स्प्रेस कधी सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:02 AM2021-06-27T04:02:02+5:302021-06-27T04:02:02+5:30
औरंगाबाद : औरंगाबादमार्गे बहुतांश एक्स्प्रेस रेल्वे सुरू झाल्या आहेत. मात्र, मुंबई आणि नागपूरला जाण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली नंदीग्राम एक्स्प्रेस ...
औरंगाबाद : औरंगाबादमार्गे बहुतांश एक्स्प्रेस रेल्वे सुरू झाल्या आहेत. मात्र, मुंबई आणि नागपूरला जाण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली नंदीग्राम एक्स्प्रेस अजूनही सुरू झालेली नाही. हैदराबाद पॅसेंजरवगळता अन्य पॅसेंजर रेल्वेही अजूनही यार्डातच आहेत. त्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. नंदीग्राम एक्स्प्रेससह पॅसेंजर कधी सुरू होणार, असा सवाल प्रवाशांतून उपस्थित होत आहे.
कोरोना प्रतिबंधाच्या पहिल्या लाटेत रेल्वे काही दिवस पूर्ण ठप्प होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर एक्स्प्रेस रेल्वे धावण्यास सुरुवात झाली; परंतु पॅसेंजर बंदच ठेवण्यात आल्या. दुसऱ्या लाटेतील निर्बंधांमुळेही प्रवासी संख्या घटली. त्यामुळे काही रेल्वे तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्या. दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर रद्द केलेल्या रेल्वे पुन्हा रुळावर आल्या. मुंबईला जाण्यासाठी जनशताब्दी, तपोवन, देवगिरी, राज्यराणी एक्स्प्रेस आहे; परंतु नंदीग्राम एक्स्प्रेस अजूनही सुरू झालेली नाही. याशिवाय काही रेल्वे अजूनही बंदच आहेत. यात पॅसेंजर रेल्वेंची संख्या सर्वाधिक आहे. पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांना बस, खाजगी वाहन अथवा दुचाकीवरून ये-जा करावी लागत आहे. त्यात बराच वेळ आणि पैसा जातो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर तात्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांतून जोर धरत आहे.
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
- सचखंड एक्स्प्रेस
- देवगिरी एक्स्प्रेस
- जनशताब्दी एक्स्प्रेस
- तपोवन एक्स्प्रेस
-अंजता एक्स्प्रेस
- रेणिगगुंठा एक्स्प्रेस
- मराठवाडा एक्स्प्रेस
-----
या रेल्वे कधी सुरू होणार?
- नंदीग्राम एक्स्प्रेस
- काचीगुडा - नगरसोल पॅसेंजर
- निजामाबाद - पुणे पॅसेंजर
- नांदेड - दौंड पॅसेंजर
- जालना - नगरसोल डेमू पॅसेंजर
- नांदेड - नगरसोल पॅसेंजर
-------
पॅसेंजर गाड्यांचे घोडे कुठे अडले?
- औरंगाबाद-हैदराबाद ही पॅसेंजर रेल्वेही विशेष रेल्वे म्हणून सध्या धावत आहे; परंतु अन्य पॅसेंजर रेल्वे अद्यापही बंदच आहेत. नाेकरी, व्यवसायानिमित्त रोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांसाठी पॅसेंजर महत्त्वपूर्ण ठरतात.
- अन्य विभागात, इतर राज्यांत पॅसेंजर रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. मग केवळ नांदेड विभागातीलच पॅसेंजर का सुरू केल्या जात नाहीत, असा सवाल प्रवासी उपस्थित करीत आहेत.
- रस्ते मार्गाने ये-जा करताना अनेक गैरसोयीला सामोरे जावे लागते. त्यामुळे पॅसेंजर रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.
---
प्रवासी संघटना काय म्हणतात?
प्रवाशांची गैरसोय
पॅसेंजर बंद असल्याने दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेच्या विभागात रेल्वे सुरू होतात; पण नांदेड विभागातून पॅसेंजर का सुरू केल्या जात नाहीत, असा प्रश्न आहे. नंदीग्राम एक्स्प्रेसही बंद असल्याने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.
-संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सेना
---
नंदीग्राम, पॅसेंजर सुरू करा
नंदीग्राम एक्स्प्रेस आणि बंद असलेल्या पॅसेंजर लवकरात लवकर सुरू केल्या पाहिजेत. अन्य राज्यांतही पॅसेंजर सुरू करण्यात आल्या आहेत. आपल्याकडेच दुर्लक्ष केले जात आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले पाहिजे.
- गौतम नाहाटा, अध्यक्ष, नमो रेल्वे संघटना
-----
एक्स्प्रेस आणि पॅसेंजर सुरू करण्याबाबतचे निर्णय वरिष्ठ पातळीवरून होतील, असे रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
फोटो ओळ...
औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर सध्या प्रवाशांची अशी गर्दी पाहायला मिळत आहे.