परराज्यात जाणाऱ्या रातराणी बसेस कधी सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:04 AM2021-08-01T04:04:57+5:302021-08-01T04:04:57+5:30
एकमेव सुरत रातराणी सुरू : अन्य राज्यांचे अद्याप निर्णय नाही - साहेबराव हिवराळे- औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बससेवा ...
एकमेव सुरत रातराणी सुरू : अन्य राज्यांचे अद्याप निर्णय नाही
- साहेबराव हिवराळे-
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बससेवा हळूहळू पूर्वपदावर येत असून राज्यांतर्गत रातराणी बसेस सुरू झाल्या आहेत. मात्र, सुरतशिवाय इतर राज्यांतील रातराणीला अद्यापही एसटी महामंडळाकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे प्रवाशांची अडचण होत आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाने दळणवळण बंद केले होते. फक्त अत्यावश्यक कामांसाठीच परवानगी घेऊन खासगी गाड्यांची वाहतूक सुरू होती. अलीकडे दुसऱ्या लाटेत औरंगाबादेतील समृद्धी महामार्ग, नवीन बीड बायपास तसेच औद्योगिक क्षेत्रातील हजारो परप्रांतीय मजूर गावी निघून गेले होते. त्यांची आता सोय झाली असली, तरी औरंगाबादेतून काहींना वैयक्तिक कामांसाठी शेजारील राज्यात जायचे असेल, तर मात्र त्यांच्यासाठी रातराणीची सुविधा मिळणार नाही. दुसऱ्या राज्यांच्या परिवहन विभागाने औरंगाबादेत येणाऱ्या बसेससाठी परवानगी दिली आहे.
सध्या सुरू असलेलेल्या राज्यांतर्गत रातराणी
औरंगाबाद-पुणे
मुंबई-पुणे
औरंगाबाद-अहमदनगर
नाशिक-मुंबई
परराज्यात रातराणी बंदच
औरंगाबाद-हुबळी
औरंगाबाद-विजापूर
औरंगाबाद-इंदूर
औरंगाबाद-अहमदाबाद
औरंगाबाद-निजाबाद
चौकट..........
परराज्यांचा निर्णय झाला
कोरोनामुळे बंद करण्यात आलेल्या रातराणी बसेस हळूहळू सुरू करण्यात येत आहेत. सध्या औरंगाबाद-सुरत ही रातराणी सुरू झालेली आहे; परंतु मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यांचे अद्याप निर्णयच झालेले नाहीत. त्यामुळे त्या गाड्या अद्याप येत नाहीत.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ औरंगाबाद.
सीमेवरच्या गावात सोडत असल्याने गैरसोय
कोरोना महामारीने सर्वांनीच खबरदारी घेतली असून, परराज्यात जाताना चाचण्या करूनच प्रवासाला परवानगी दिली जात आहे. तिसऱ्या लाटेच्या भीतीने सीमेवरील गावांतच प्रवशांना सोडले जात आहे. त्यामुळे खर्च अधिक वाढला आहे.
- टी. डी. पाटील (प्रवासी)
तिसऱ्या लाटेच्या भीतीपोटी अनेक जण प्रवास करण्याचे धाडस करीत नाहीत. परराज्यात जाणाऱ्या गाड्याच बंद असल्याने खासगी वाहतुकीशिवाय पर्याय राहिलेला नाही. अन्यथा गाड्या बदलत जाणे त्रासदायक ठरत आहे.
- काकासाहेब गिरी (प्रवासी)