छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासासाठी रस्ते, रेल्वे अन् विमानसेवा महत्त्वाची कधी वाटणार?
By संतोष हिरेमठ | Published: April 25, 2024 05:16 PM2024-04-25T17:16:14+5:302024-04-25T17:17:50+5:30
पीपल्स मॅनिफेस्टो: किती वर्षे कागदावरच विकास? राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, जिल्हावासीयांचा प्रवास खडतरच
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ‘महाराष्ट्राची पर्यटन राजधानी’ आहे. ही राजधानी कोणाच्या मेहेरबानीवर नव्हे तर या जिल्ह्याला निसर्गदत्त पर्यटनाचे लेणे लाभल्यामुळे झाली आहे. ‘पर्यटन जिल्हा’ अशी बिरूदावलीही मिळालेली आहे. रस्ते, बससेवा, रेल्वे, विमानसेवा या दळणवळण आणि वाहतूक सुविधा परिपूर्ण असल्यावर कोणत्याही जिल्ह्याचा विकास सर्वच पातळीवर फास्ट ट्रॅकवर येतो. मात्र, वर्षानुवर्षे कागदावर अन् चर्चेतच राहणाऱ्या प्रकल्पांची स्थिती पाहता जिल्ह्याच्या विकासासाठी रस्ते, रेल्वे, विमानसेवा सरकारला महत्त्वाच्या वाटत नसल्याची ओरड जनतेतून होत आहे.
जिल्ह्यातील वाहतूक क्षेत्रासाठी अनेक नव्या गोष्टींची घोषणा करण्यात आली. मात्र, काही गोष्टी झाल्या, तर काही गोष्टी अर्धवट राहिल्या, तर काही अनेक वर्षांपासून कागदावरच. त्यामुळे वाहतूक क्षेत्राच्या विकासाला खीळ बसली आहे. रेल्वे विकासाच्या बाबतीत गेल्या दोन तीन वर्षात विद्युतीकरण, पीटलाइनचा प्रश्न मार्गी लागला. रेल्वे स्टेशनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे केले जाणार आहे. परंतु रेल्वेचा विकास झाला असे नाही. अद्यापही नव्या रेल्वेंपासून अनेक प्रश्न कधी सुटणार, असा प्रश्न प्रवाशांना भेडसावत आहे. अशीच काहीशी स्थिती विमानसेवा, रस्ते मार्गांबाबत आहे.
रेल्वे विकासासाठी हे गरजेचे...
- अंकई (मनमाड) ते छत्रपती संभाजीनगर या ९८ कि.मी. मार्गाच्या दुहेरीकरण गतीने पूर्ण करण्याची गरज.
- छत्रपती संभाजीनगर-परभणी दुहेरीकरणासाठी निधी खेचून आणावा.
- रोटेगाव- पुणतांबा हा २७ कि. मी.चा प्रस्तावित कागदावरच.
- छत्रपती संभाजीनगर - दौलताबाद-कन्नड-चाळीसगाव हा लोहमार्ग मार्गी लागणे.
- औद्योगिक दृष्टीने आवश्यक असलेल्या छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर या नवीन मार्गासाठी प्राधान्याने लक्ष घालून या मार्गाचे काम सुरू करून घ्यावे.
- छत्रपती संभाजीगरच्या पीटलाइनचा २४ बोगींसाठी विस्तार व दक्षिणेकडील मालधक्का हलवून त्याजागी नवीन प्लॅटफाॅर्म करणे गरजेचे.
- छत्रपती संभाजीनगरहून देशाच्या महत्त्वाच्या शहरांसाठी थेट रेल्वे सुरू करणे गरजेचे.
- छत्रपती संभाजीनगर-बीड-धाराशिव मार्गाला मान्यता मिळवून द्यावी.
राजकीय नेत्यांनी कधी बसस्थानक पाहिले का?
पर्यटन राजधानी असलेल्या सिडको बसस्थानकाच्या जागी उभारण्यात येणाऱ्या बसपोर्ट आणि मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे २८ ऑगस्ट २०१९ रोजी भूमिपूजन झाले. परंतु, अद्यापही हे काम सुरू झालेले नाही. मध्यवर्ती बसस्थानकाची पार दुरवस्था झालेली आहे. राजकीय नेत्यांनी कधी हे बसस्थानक जाऊन पाहिले का, असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित होतो.
इतर जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालये, इथे का नाही?
राज्यातील लातूर, जळगाव याठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यातून ग्रामीण भागातील वाहनधारकांना थेट छत्रपती संभाजीनगरच गाठावे लागते.
विमानसेवा वाढीसाठी हे आवश्यक
- शहराचा ‘उडान’ योजनेमध्ये समावेश.
- विमानतळाचे विस्तारीकरण गतीने पूर्ण करणे.
-विमानाच्या इंधनवरील व्हॅट एक टक्का केल्यास विमानसेवा वाढीस हातभार लागेल.
- एअर बेस, विमानांसह हेलिकाॅप्टर सेवा.
- आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणे.
- देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कार्गोसेवा. -औद्योगिक, पर्यटन शहरे, बुद्धिस्ट सर्किटला हवाई ‘कनेक्टिव्हिटी’.
घोषणा, पण पुढे काय?
शेंद्रा ते चिकलठाणा व पुढे वाळूजपर्यंत डबलडेकर उड्डाणपूल आणि मेट्रोची घोषणा झाली. यासह औट्रम बोगदा, छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा विद्यमान रस्ता एक्स्प्रेस-वेमध्ये करणे यासह रस्ते मार्गाचा विकास जिल्ह्यासाठी गरजेचे आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी रस्ते मार्गाच्या विकासाला ‘स्पीड’ मिळत नसल्याची परिस्थिती आहे.
प्रकल्पासाठी लक्ष देणे आवश्यक
छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊ घातलेले नवीन प्रकल्प आणि सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या नवीन खासदारांनी शहर व जिल्ह्याच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रेल्वे प्रकल्पासाठी लक्ष देणे आवश्यक आहे. छत्रपती संभाजीनगरची पीटलाइन सुरू झाल्यावर छत्रपती संभाजीनगर-मनमाड-दौंड-सोलापूर-विजापूर- गदग-हुबळी अशी एक्स्प्रेस सुरू करता येईल. कमी वेळात लांबचा फेरा न घेता चौदा-सोळा तासांत हुबळी गाठता येईल.
- स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक