तंत्रशास्त्र विद्यापीठाचे उपकेंद्र औरंगाबादेत केव्हा होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:05 AM2021-07-01T04:05:02+5:302021-07-01T04:05:02+5:30
औरंगाबाद : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी संलग्न होण्यासाठी राज्य शासनाने २०१६ मध्ये प्रोत्साहित केले. ...
औरंगाबाद : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी संलग्न होण्यासाठी राज्य शासनाने २०१६ मध्ये प्रोत्साहित केले. यास मराठवाड्यातील नामांकित अभियांत्रिकी, वस्तुकला आणि औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांनी प्रतिसाद दिला. तेव्हा मराठवाड्यातील महाविद्यालयांसाठी औरंगाबादेत उपकेंद्र स्थापन करण्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा अद्यापही प्रत्यक्षात आलेली नाही. त्यामुळे शेकडो किलोमीटर दूर जाऊन विद्यापीठाशी संबंधित महाविद्यालयांची कामे करणे शक्य होत नाही. विद्यापीठात गेल्यानंतर तेथेही कर्मचारी नसल्यामुळे कामे होत नाहीत. औरंगाबादेत उपकेंद्र केव्हा होणार? असा सवाल मराठवाड्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन केला.
लोणेरे येथील विद्यापीठात सद्यस्थितीत कुलगुरूपासून कुलसचिव, परीक्षा संचालकांसह इतर अधिकारी प्रभारी आहेत. सर्वच कारभार प्रभारी असणारे हे एकमेव विद्यापीठ असेल. या विद्यापीठाला संलग्न महाविद्यालये नामांकित आहेत. या महाविद्यालयांनी देशासाठी हजारो अभियंते घडविले आहेत. पूर्वीच्या प्रचलित विद्यापीठांची संलग्नता नाकारून तंत्रशास्त्र विद्यापीठाची संलग्नता घेतली होती. विद्यापीठाच्या धोरणात्मक नियोजनात मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथे मुख्य केंद्र आणि अमरावती, जळगाव, कोल्हापूर, नांदेड व सोलापूर येथे उपकेंद्र स्थापन केली जाणार होती. या केंद्रांमध्ये विविध पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यातील एकही निर्णय अंमलात आलेला नाही. हे प्रश्न केव्हा सोडविले जाणार अशीही विचारणा प्राचार्यांनी मंत्री सामंत यांना केली आहे. याशिवाय शिष्यवृत्तीसह इतरही महत्वाचे प्रश्न प्रलंबित असल्याचे मंत्र्यांच्या निर्दशनास आणून दिले. यावेळी प्राचार्य डॉ. उल्हास शिऊरकर, डॉ. अभिजीत वाडेकर, डॉ. उल्हास शिंदे, डॉ. निलेश पाटील, डॉ. एस. के. बिरादार, डॉ. रामकिसन पवार, प्रा. गोविंद ढगे, डॉ. गणेश तापडीया, डॉ. संतोष शेळके, प्रा. एस. एस. जायभाये, डॉ. राजेंद्र कवडे, गजानन सानप, डॉ. दीपक मुसमाडे, डॉ. प्रशांत तायडे, डॉ. शांताराम खनगे, डॉ. विठ्ठल कुचके, डॉ. नम्रता सिंग आदींचा समावेश आहे.
चौकट,
आम्ही चुकलो की काय?
मागील चार वर्षांचा इतिहास पाहता निर्णय चुकला की काय अशी द्विधा परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यापीठ स्थापन करताना विभागवार केंद्र व उपकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. ते केंद्र आतापर्यंत पूर्ण क्षमतेने कोठेही स्थापन झाले नाही. जळगावमध्ये एका खासगी महाविद्यालयात उपकेंद्र असले तरी त्या ठिकाणी कोणतेही काम होत नाही. विद्यापीठात भ्रमणध्वनीला रेंज नसल्यामुळे किरकोळ कामासाठीही संपर्क होत नाही. ही गंभीर बाब आहे. या विद्यापीठाची संलग्नता स्वीकारल्यानंतर पहिली बॅच यावर्षी पदवी घेऊन बाहेर पडणार आहे. विद्यार्थ्यांचे गुणपत्रिकेवर साधे नाव चुकले तरी दुरुस्त करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. हे सर्व केव्हा संपणार आहे असा सवालही प्राचार्यांनी उपस्थित केला आहे.