शेतीच्या बांधापर्यंत कधी जाईल कार; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत ३४९ पाणंद रस्ते पूर्ण
By विजय सरवदे | Published: July 24, 2024 08:08 PM2024-07-24T20:08:10+5:302024-07-24T20:09:04+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४५७ पाणंद रस्त्याची कामे मंजूर झाली आहेत
छत्रपती संभाजीनगर : शेतीच्या बांधापर्यंत वाहन घेऊन जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. अनेकदा शेतमालाची वाहतूक तसेच शेती कसण्यासाठी लागणारी आधुनिक यंत्रसामग्री घेऊन जाणेही शक्य होत नाही. अलीकडे शासनाने गावागावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना’ अंमलात आणली. परंतु, या रस्त्याच्या कामासाठी मजुरांचा तुटवडा असल्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ३४९ एवढेच पाणंद रस्ते पूर्ण होऊ शकले.
देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७५ वर्षे उलटली आहेत. तरीदेखील आजही शेतकऱ्यांना चिखलातूनच वाट काढत शेतावर जावे लागते. शेतकऱ्यांची ही अडचण सोडविण्यासाठी शासनाने रस्त्यासाठी भरपूर निधीही उपलब्ध करून दिला आहे. मात्र, मनरेगा अंतर्गत रस्ते कामांऐवजी मजुरांचा कल हा गुरांचे गोठे, घरकुले, ग्रामपंचायत भवन, पेव्हर ब्लॉक, विहीर पुनर्भरण, वैयक्तिक विहिरी, अशा वैयक्तिक स्वरूपाच्या कामांकडेच जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणंद रस्त्याच्या योजनेला फारसी गती मिळत नसल्याचे चित्र आहे.
काय आहे पाणंद रस्ते योजना
यांत्रिकीकरणामुळे शेतीत पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रामार्फत होतात. अशा यंत्रसामग्रीची वाहतूक करण्यासाठी पावसाळ्यातही पाणंद रस्ते चांगले असणे काळाची गरज आहे. या दृष्टिकोनातून राज्य शासनाने २७ फेब्रुवारी २०१८ रोजी पाणंद रस्ते योजना अंमलात आणली.
जिल्ह्यात ३४९ रस्ते पूर्ण; १४३८ कामे प्रगतिपथावर
जिल्ह्यात ८७० ग्रामपंचायतींच्या हद्दीत २४५७ पाणंद रस्त्यांची कामे मंजूर आहेत. यापैकी १७८० कामे ग्रामपंचायती, तर तहसील कार्यालयामार्फत ७६९ कामे केली जात आहेत. यापैकी जिल्हा परिषदेने १६१३ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली असून, आतापर्यंत ३४९ रस्ते पूर्ण झाले, तर १४३८ कामे प्रगतिपथावर आहेत.
तालुकानिहाय आकडेवारी काय सांगते
तालुका- पाणंद रस्ते पूर्ण- प्रगतिपथावर
छत्रपती संभाजीनगर- २९- १५५
फुलंब्री- ०८- १०५
सिल्लोड- २५- ११०
सोयगाव- ०९- १३
कन्नड- ५०-२६४
खुलताबाद- ०५- १९
गंगापूर- ३८- १५३
वैजापूर- ४२- १९७
पैठण- १४३- ४२२
अडीच हजार शेतरस्त्यांचे भाग्य उजळणार
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जिल्ह्यात २४५७ पाणंद रस्त्याची कामे मंजूर आहेत. ग्रामपंचायत आणि तहसील या दोन यंत्रणांनी मनावर घेतले तर पावसाळ्यानंतर पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. दरम्यान, या मंजूर रस्त्यांचे भाग्य कधी उजळेल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.