स्टार्टअपला पाठबळ देणारे विद्यापीठ ‘ग्लोबल’ होणार कधी
By विजय सरवदे | Published: August 23, 2022 06:42 PM2022-08-23T18:42:51+5:302022-08-23T18:43:37+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज ६४ वा वर्धापन दिन
- विजय सरवदे
औरंगाबाद : बघता बघता विद्यापीठाने ६४ वर्षे पूर्ण केली. दरम्यान, अध्यापन आणि संशोधनाच्या प्रक्रियेत गुणवत्ता व सामाजिक बांधीलकी हे ब्रीद जोपासत विद्यापीठाने राष्ट्र निर्मितीत योगदान देणारे विद्यार्थी, संशोधक घडविण्याचा प्रयत्न केला. यंदा नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्कअंतर्गत देशातील शंभर विद्यापीठांमध्ये या विद्यापीठाला ८३ वा रँक मिळाला असून, नॅकचे ‘अ’ दर्जाचे मानांकन आणि जवळपास १५ पेटंट मिळविले असून, आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सर्वेक्षणात या विद्यापीठाचे अनेक अध्यापक टॉपर ठरले आहेत.
सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या इमारतीत विद्यापीठाचे प्रशासन आणि अध्यापनाचे कार्य चालायचे. नंतर बुद्धलेणीलगत जवळपास ७५० एकरांत विद्यापीठाची प्रशस्त प्रशासकीय इमारत, परीक्षा भवन, ग्रंथालय व विभागनिहाय इमारती आकाराला आल्या. प्रामुख्याने मराठवाड्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी हे विद्यापीठ कार्य करीत असले, तरी आज या विद्यापीठात ३० ते ४० विदेशी मुले शिक्षण घेत आहेत. विद्यापीठाने शैक्षणिक, भौतिक प्रगती साधली असून, या विद्यापीठाला युरोपियन युनियन व अन्य राष्ट्रांकडून मोठमोठे संशोधन प्रोजेक्ट मिळाले आहेत. स्पेनने विद्यापीठासोबत करार करून येथे क्वॉलिटी ॲशुरन्समध्ये गती घेण्यासाठी प्रोजेक्ट तर दिलेच, याशिवाय येथे लॅबही उभारली. त्यासाठी लाखो रुपयांची उपकरणे दिली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यातील मुला-मुलींना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी औरंगाबादेत १९५० ला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. तेव्हा त्यांनी इथे विद्यापीठ असावे, अशी भावना व्यक्त केली होती. अखेर २३ ऑगस्ट १९५८ रोजी त्याला मूर्त रूप मिळाले आणि तत्कालीन मराठवाडा विद्यापीठ आणि आताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यान्वित झाले. पुढे या विद्यापीठाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रकांडपंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नाव मिळावे म्हणून १९७७-७८ मध्ये मागणी पुढे आली. या मागणीला विरोध वाढला. मराठवाड्यात दंगली उसळल्या. नामांतराच्या लढ्यात अनेकांनी प्राणाची आहुती दिली. तब्बल १७ वर्षांनंतर १४ जानेवारी १९९४ रोजी या विद्यापीठाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’, असा नामविस्तार झाला आणि नांदेडला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची निर्मिती झाली.
विद्यापीठाने परिसरातील, तसेच सर्व महाविद्यालयातील पदव्युत्तर विभागांसाठी ‘चाॅइस बेस्ड क्रेडिट सिस्टम’ सुरू केली आहे. गेल्या काही वर्षांत नेट-सेट व जेआरएफ फेलोशिप प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोंच्या पुढे गेली आहे. अलीकडच्या काही वर्षांत या विद्यापीठाने सर्वांगीण प्रगती साधली असली, तरी विद्यापीठातील अनेक विभागांत अध्यापकांची पदे रिक्त आहेत. अनेक जुणेजाणतेे अध्यापक सेवानिवृत्त होत आहेत. संशोधनात होत असलेल्या कॉपीपेस्ट संस्कृतीला आळा घालून या परिसरात शैक्षणिक व संशोधन संस्कृती कायम जपण्यासाठी प्रशासनाने वेळीच पावले उचलावीत. येथे दर्जेदार, समाजोपयोगी संशोधन व्हावे. अर्थात, विद्यापीठाला वैश्विक दर्जाची स्पर्धा करावी लागणार आहे. एका अर्थाने विद्यापीठाने आता ग्लोबल विद्यापीठाच्या दृष्टीने वाटचाल सुरू करावी, अशी अपेक्षा अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
विद्यापीठाची ठळक वैशिष्ट्य
- विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील ४०० हून अधिक महाविद्यालये संलग्नित असून, साडेतीन ते पावणेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
- देशातील अग्रगण्य ग्रंथालयांपैकी विद्यापीठातील ग्रंथालय गणले जाते. ग्रंथालयात पावणेचार लाख ग्रंथसंपदा असून, जवळपास ५ हजार दुर्मीळ ग्रंथ उपलब्ध आहेत. इलेक्ट्रॉनिक थेसिस डेटाबेस, ग्रंथालय संगणकीकरण, ई-लायब्ररी, स्मार्ट कार्ड, सीडी-डीव्हीडी लायब्ररी, सुसज्य वाचनकक्ष, रिमोट ॲक्सेस, वेबकॅफे मॅनेजमेंट आदींनी हे ग्रंथालय परिपूर्ण आहे.
- विद्यापीठातील इन्क्युबेशन सेंटरमार्फत स्टार्टअपला पाठबळ दिले जात आहे. दोन वर्षांत या सेंटरमार्फत ४३ स्टार्टअप सुरू झाले आहेत.