मराठवाड्यासाठी ‘हवामान’चे एक्स-बॅण्ड रडार कधी देणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:04 AM2021-06-30T04:04:02+5:302021-06-30T04:04:02+5:30
हवामानाच्या अचूक अंदाजाचा अभाव; अतिवृष्टीने दोन वर्षांत ७० लाख हेक्टरवरील पिके गेली वाया विकास राऊत औरंगाबाद : मराठवाड्यात दोन ...
हवामानाच्या अचूक अंदाजाचा अभाव; अतिवृष्टीने दोन वर्षांत ७० लाख हेक्टरवरील पिके गेली वाया
विकास राऊत
औरंगाबाद : मराठवाड्यात दोन वर्षांपासून अतिवृष्टी, ढगफुटी होत असून, सुमारे ७० लाख हेक्टरवरील खरीप हंगामाची माती झाली. हवामानाचा अचूक अंदाज, माहिती पोहोचत नसल्यामुळे शेतकरी दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या कचाट्यात अडकला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील हवामानाचे स्वतंत्ररीत्या संशोधन आणि विश्लेषण होण्यासाठी एक्स-बॅण्ड डॉप्लर रडार बसविण्यात यावे, अशी मागणी शेतकरी, उद्योजकांकडून होत आहे.
मराठवाड्यातील शेती मुख्यत: पावसावर अवलंबून असल्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज मिळणे गरजेचे आहे. मात्र, तो मिळत नसल्याने गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टी, ढगफुटी अथवा पावसाअभावी शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. लहरी हवामानाचा परिणाम येथील औद्योगिक विकासावरदेखील होत असल्याचे शेतकरी, उद्योजकांचे म्हणणे आहे. त्यातूनच मराठवाड्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉफिकल मेट्रॉलॉजी (आयआयटीएम)ने स्वतंत्र रडार बसवावे, अशी मागणी पुढे आली आहे.
आयआयटीएमचे युनिट येण्यास उशीर लागेल. त्यामुळे किमान एक्स-बॅण्ड रडार तरी या विभागासाठी शासनाने बसविणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी पाऊल उचलले गेले, तर येथील शेती, माणसे, जनावरे अतिवृष्टी आणि दुष्काळाच्या तडाख्यातून वाचण्यास मदत होणे शक्य होईल.
आयएमडीची मुंबई, नागपूर, पुणे येथे (आरएमसी) प्रादेशिक हवामान केंद्रे आहेत. मात्र, मराठवाडा आणि विदर्भ आणि खान्देश व उत्तर महाराष्ट्रात अद्याप काहीही निर्णय होत नसल्यामुळे हा विभाग शेतीसह सगळ्या बाबीत वाऱ्यावर आहे.
----------------
यासाठी हवे आहे येथे रडार
नागपूरला रडार बसविले. त्यावर मिरर बसविण्याची तयारी होती; परंतु तेही मागे पडले. सोलापूर विमानतळावर कृत्रिम पावसाचे रडार आहे, तर महाबळेश्वरला ढगांचा अभ्यास करण्यासाठी आयआयटीएमचे रडार आहे. मुंबई आणि गोव्याच्या रडारवरून कोकण किनारपट्टीचा अभ्यास होतो. दोन वर्षांपासून मराठवाड्यातील बहुतांश तालुक्यांत सरासरीच्या दहापट पाऊस होतो आहे. ढगफुटीचे प्रमाण वाढले आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातदेखील असेच प्रमाण आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, सिल्लोड, जालन्यातील अनेक तालुक्यांत ढगफुटी होऊन पिके वाया गेली. मराठवाड्यातील ४२ हून अधिक तालुक्यांत ढगफुटीने खरीप हंगाम वाया जात असल्याचे प्रमाण मागील दोन वर्षांत दिसून आले आहे.
---------------------------
चारपैकी एक रडार मराठवाड्यात यावे
आयआयटीएम चार रडार आणत आहे. त्यातील एक रडार तरी औरंगाबादला बसविण्यात यावे, अशी मागणी हवामान अभ्यासक प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केली आहे. संशोधन आणि विश्लेषण युनिट स्थापन होईपर्यंत ४० कोटींचे एक्स-बॅण्ड रडार औरंगाबादला बसविले जावे, अशी त्यांची मागणी आहे. मध्यंतरी सिल्लोड येथील अजिंठा लेणी परिसरात रडार बसविण्यासाठी मागणी पुढे आली होती. त्यासाठी शेतकऱ्यांनी जागा देण्याची तयारीदेखील केली होती. आजवर एक्स-बॅण्ड रडार बसविले असते, तर मराठवाड्याच्या ढगफुटीची माहिती त्या रडारवरून मिळाली असती.
------------------------------
एक वर्षापूर्वी झाली होती बैठक
औरंगाबादला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉफिकल मेट्रॉलॉजी (आयआयटीएम) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेट्रॉलॉजी (आयआयएम)च्या शास्त्रज्ञ आणि संचालकांसोबत एक बैठक कोरोना संसर्गापूर्वी झाली होती. त्या बैठकीत आयआयएमडीचे एक रडार औरंगाबादला स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती, दुर्दैवाने त्याबाबत कोरोनामुळे काहीही निर्णय झाला नाही.
------------------------
औरंगाबादेत टीम काही आली नाही
कोरोना संसर्गापूर्वी औरंगाबादमध्ये आयआयटीएमचे एक युनिट यावे किंवा रडार बसवावे, यासाठी मागणीच्या अनुषंगाने बैठक घेतली होती. शास्त्रज्ञ डॉ. गुफरान बेग त्या बैठकीत होते. एक पथक पाहणीसाठी औरंगाबादेत येणार होते; परंतु कोरोनामुळे पुढे काही बोलणे झाले नाही. याबाबत नव्याने मागणी करण्यात येईल.
-इम्तियाज जलील, खासदार
-------------------------------------
अधिवेशनात प्रस्ताव ठेवणार
मराठवाड्यातील हवामान खात्याचे युनिट होणे अथवा रडार बसविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी केंद्रीय विज्ञान मंत्रालयाकडे पाठपुरावा करतो, तसेच संसदेच्या अधिवेशनात याबाबत प्रस्ताव ठेवून खात्याचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनादेखील बोलणार आहे.
-डॉ. भागवत कराड, राज्यसभा सदस्य
प्रस्ताव आल्यास निश्चितपणे तयारी करू
आयएमडीचे पुणे येथील प्रमुख डॉ. अनुपम कश्यप यांनी सांगितले, मराठवाड्यासाठी वेगळे युनिट सुरू करण्याचा सध्या काहीही प्रस्ताव नाही. दोन वर्षांपासून मराठवाड्यात जास्तीचा पाऊस होता आहे, हे बरोबर आहे. मराठवाड्यासाठी रडार बसविण्याचा प्रस्ताव आला, तर निश्चितपणे त्यासाठी परिश्रम घेण्याचा प्रयत्न केला जाईल.
------------------------------------
रडार बसविल्यास अचूक माहिती येईल
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान खात्यातील शास्त्रज्ञ डॉ. के.के. डाखोरे यांनी सांगितले, विद्यापीठातील केंद्रावरून परभणी जिल्ह्याचा अभ्यास केला जातो. मराठवाड्यातील हवामानाच्या अचूक अंदाजासाठी एक्स-बॅण्ड रडार बसवण्याची मागणी आहे, ती पूर्ण झाल्यास विभागाचा मोठा फायदा होईल.