लागेल जेव्हा आग...तेव्हा येईल जाग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:24 AM2017-10-17T01:24:10+5:302017-10-17T01:24:10+5:30
शहरातील किती रस्ते अरुंद आहेत, किती ठिकाणी अग्निशमन विभागाचा बंब जाऊ शकतो किंवा नाही, याबाबत अग्निशमन विभागाने सर्वेक्षणच केले नसल्याचे समोर आले आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील किती रस्ते अरुंद आहेत, किती ठिकाणी अग्निशमन विभागाचा बंब जाऊ शकतो किंवा नाही, याबाबत अग्निशमन विभागाने सर्वेक्षणच केले नसल्याचे समोर आले आहेत. अगोदरच प्रभारीवरच चाललेल्या या विभागाचे कामकाज ढेपाळले आहे. सद्य:परिस्थितीत पाहता जेव्हा आग लागेल, तेव्हा विभागाला जाग येईल, असे चित्र दिसत आहे.
बीड शहरातील हद्दवाढ भागात मोठमोठे रस्ते झाले. प्रत्येक ठिकाणी मोठी वाहने जातील अशी जागा आहे; परंतु पेठबीड, माळीवेस आदी भागांत आजही अरुंद रस्ते आहेत. या भागात एखादी आगीची दुर्दैवी घटना घडली तर अग्निशमन विभागाकडे कसल्याचे उपाययोजना नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
सध्या नगरपालिकेअंतर्गत चाललेल्या अग्निशमन विभागात तीन बंब उपलब्ध आहेत; परंतु त्यांना अपेक्षित साहित्य मिळत नाही. त्यामुळे अनेक वेळा आग आटोक्यात आणण्यास कसरत करावी लागते. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही संबंधित अधिकाºयांकडून अद्यापही उपाययोजना करण्यात उदासीनता असल्याचा आरोप मनविसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव यांनी केला आहे. वेळीच यावर उपाययोजना केल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.