बनावट औषधींची निर्मिती कुठे, कच्चामाल कुठून मिळतो? गुन्हा दाखल, आता होणार तपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 13:45 IST2025-04-19T13:44:06+5:302025-04-19T13:45:29+5:30
राज्यभरातील विविध शहरांसह छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात कोल्हापूरच्या मे. विशाल एंटरप्रायजेसने बनावट औषधी पुरवठा केल्याचे डिसेंबर २०२४ मध्ये समोर आले होते.

बनावट औषधींची निर्मिती कुठे, कच्चामाल कुठून मिळतो? गुन्हा दाखल, आता होणार तपास
छत्रपती संभाजीनगर : राज्यभरासह छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात बनावट औषधींचा पुरवठा केल्याप्रकरणी अखेर ४ महिन्यांनंतर बुधवारी गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर औषधींची निर्मिती कुठे झाली आणि त्यासाठी लागणारा कच्चामाल, औषधींच्या पॅकिंगसाठी लागणारे पॅकिंग मटेरीयल कुठे मिळते, याचा तपास केला जाणार आहे.
राज्यभरातील विविध शहरांसह छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात कोल्हापूरच्या मे. विशाल एंटरप्रायजेसने बनावट औषधी पुरवठा केल्याचे डिसेंबर २०२४ मध्ये समोर आले होते. यानंतर घाटी रुग्णालय प्रशासनाने या औषधींचा वापर थांबविला. परंतु तोपर्यंत शेकडो गोळ्या रुग्णांच्या पोटात गेल्या होत्या. एका पुरवठादाराने दुसऱ्याला, दुसऱ्या पुरवठादाराने तिसऱ्याला आणि तिसऱ्या पुरवठादाराने ही औषधी घाटीला पुरवठा केल्याचे समोर आले. याप्रकरणी बुधवारी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी आता या औषधींची निर्मिती कुठे झाली, त्यासाठी लागणारा कच्चामाल आणि इतर साहित्य कुठून आले, याचा तपास केला जाणार आहे.
केरळला कंपनीच नसल्यावर शिक्कामोर्तब
घाटी रुग्णालयाला पुरवठा झालेल्या बनावट औषधी केरळमधील कंपनीने निर्मिती केल्याचे नमूद केले होते. परंतु प्रत्यक्षात ही कंपनी अस्तित्वात नसल्याचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने २७ डिसेंबर २०२४ रोजी प्रकाशित केले होते. अन्न व औषध प्रशासनाचे (औषधे) सहायक आयुक्त श्याम साळे म्हणाले, संबंधित कंपनीची पाहणी करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु केरळला ही कंपनी नसल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.
लॅबकडून चाचणीनंतर औषधी रुग्णांना
बनावट औषधी पुरवठ्याच्या प्रकारानंतर घाटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात आता खरेदी केलेल्या औषधींची आधी ‘एनएबीएल’ लॅबकडून तपासणी केली जात आहे. अहवाल आल्यानंतच ती रुग्णांना देण्यात येत आहेत.