महायुतीच्या औरंगाबादमधील उमेदवाराचे घोडे अडले तरी कुठे? पाडवा, रामनवमीचा मुहूर्त टळला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 12:31 PM2024-04-18T12:31:43+5:302024-04-18T12:32:50+5:30
मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता, भाजपची यंत्रणा थंड असल्याने संभ्रम
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार घोषित होण्यास बराच विलंब झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे, तर दुसरीकडे भाजपची सगळी प्रचार यंत्रणा ठप्प झाल्याने शिंदेसेनेच्या चिंतेत भर पडली आहे.
आजपासून लोकसभा निवडणुकीच्या चौथा टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या टप्प्यात मराठवाड्यातील औरंगाबादसह जालना आणि बीड अशा तीन मतदारसंघाचा समावेश आहे. जालना, बीडमधील महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर झाले असून, ते प्रचारालादेखील लागले आहेत. मात्र, औरंगाबादेत महायुतीचे घोडे अजून अडलेले आहे. या मतदारसंघात गेल्या दोन वर्षांपासून भाजपची तयारी सुरू होती. संभाव्य उमेदवार म्हणून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे नाव समोर आले होते. डॉ. कराड यांनीदेखील संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. मात्र, ऐनवेळी या जागेवर शिंदेसेनेने दावा सांगितल्याने जागा वाटपाचे घोडे अडले. औरंगाबादसह पालघर, ठाणे, नाशिक या चार जागांवर महायुतीत अद्याप एकमत झालेले नाही. औरंगाबादची जागा शिंदेसेनेकडे गेल्याचे भाजपचेही खासगीत सांगत आहेत. डॉ. कराड यांच्यावर पक्षाने नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन मतदारसंघाची जबाबदारी सोपविल्यामुळे ते उमेदवारीच्या रेसमधून बाहेर पडल्याचे बोलले जाते.
नावावर एकमत होईना?
शिंदेसेनेकडून मंत्री संदीपान भुमरे, राजेंद्र जंजाळ आणि विनोद पाटील इच्छुक आहेत. मात्र, या तिन्ही नावांवर पक्षांतर्गत एकमत होत नसल्याने उमेदवाराच्या नावाची घोषणा लांबणीवर पडली आहे. शिंदेसेनेतील काही आमदार भुमरे यांच्यासाठी आग्रही आहेत, तर काहींनी पक्षाबाहेरच्या व्यक्तीचा आग्रह धरल्याचे समजते. ऐनवेळी चौथ्याच व्यक्तीचे नाव तर समोर येणार नाही ना, अशी शंकाही काहीजणांनी व्यक्त केली.
कधी करणार प्रचार?
महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी लवकर जाहीर झाल्याने ते प्रचाराला लागले आहेत. मतदारसंघात त्यांच्या दोन प्रचारफेरीदेखील झाल्या आहेत. सध्या त्यांचा गाठीभेटींवर भर आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या प्रचारसभांचे नियोजन झाले आहे. एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हेदेखील प्रचाराला लागले असून, पक्षप्रमुख असदोद्दीन ओवेसी यांचे मतदारसंघात दोन दौरे झाले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार प्रचाराला लागले असताना महायुतीत सामसूम आहे. उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच काल प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन उरकण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित नेत्यांच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता लपून राहिली नाही.