सीएनजी तरी कुठे स्वस्त ठेवला ? पेट्रोल- डिझेलपाठोपाठ सीएनजीच्या दराची घोडदौड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 01:32 PM2022-01-17T13:32:33+5:302022-01-17T13:32:49+5:30
सीएनजीला शंभरी गाठायला आता २३.४५ रुपयांचा फरक राहिला आहे. यामुळे वाहनधारकांची आर्थिक चिंता
औरंगाबाद : पेट्रोल- डिझेलला पर्याय म्हणून जून २०२१ पासून शहरात सीएनजी पंप सुरू झाले. मात्र, पेट्रोल- डिझेलपेक्षा स्वस्त असणारा सीएनजी सुरुवातीला ६८ रुपये किलो विकला गेला; पण ८ महिन्यांत किमती वधारून सध्या ७६.५५ रुपये किलोचा दर आहे. पेट्रोल- डिझेलपाठोपाठ सीएनजी १०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचेल काय. अशी चिंता सीएनजी कारचालकांना सतावत आहे.
शहरात सीएनजीचे ४ पंप
मागील ८ महिन्यांत शहरात सीएनजीचे ४ पंप सुरू झाले आहेत. आणखी ४ पंप येत्या काळात सुरू होणार आहेत. जिल्ह्यात ११६ पेट्रोल पंप आहेत.
सीएनजी पेट्रोलच्या मार्गावर
पेट्रोलपेक्षा स्वस्त असल्याने मी सीएनजी किट बसून घेतले; पण सीएनजीला शंभरी गाठायला आता २३.४५ रुपयांचा फरक राहिला आहे. यामुळे आर्थिक चिंता वाढली आहे.
-प्रसाद निरखी, सीएनजी कारधारक
पाईपलाईन आल्यास होणार स्वस्त
पाइपने सीएनजी कधी मिळणार? सध्या बॉटलिंगमध्ये सीएनजी मिळत आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यापेक्षा महाग मिळत आहे. सीए पाइपलाइनचे काम कासवगतीने सुरू आहे. पाइपलाइन सुरू कधी होते, याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत.
-सुहास पाटणी, सीएनजी कारधारक
पेट्रोल- डिझेलसोबत सीएनजी महाग महिना वर्ष पेट्रोल डिझेल सीएनजी (किलो)
जानेवारी २०२१ ९२.१० रु. ८०.०५ रु. ००.००
फेब्रुवारी ९३.५८ रु. ८२.७४ रु. ००.००
मार्च ९८.१७ रु. ८७.८२ रु. ००.००
एप्रिल ९७.५८ रु. ८७.२० रु. ००.००
मे १०१.४९ रु. ९२.०१ रु. ००.००
जून १०१.४९ रु. ९२.०१ रु. ६८.०० रु.
जुलै १०५.६३ रु. ९५.९४ रु. ६९.५० रु.
ऑगस्ट १०८.५३ रु. ९६.६५ रु. ६९.९५ रु.
सप्टेंबर १०८.१९ रु. ९५.६५ रु. ७०.८५ रु.
ऑक्टोबर १०८.७२ रु. ९७.१० रु. ७१.३५ रु.
नोव्हेंबर १११.६४ रु. ९५.७६ रु. ७६.५५ रु.
डिसेंबर ११०.७८ रु. ९३.४९ रु. ७८.५५ रु.
जानेवारी २०२२ ११०.७८ रु. ९३.४९ रु. ७६.५५ रु.