'त्या दाढीकडे एवढे पैसे कुठून आले'; एकनाथ शिंदेंची ईडी चौकशी करण्याची चंद्रकांत खैरेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 12:44 PM2022-06-28T12:44:47+5:302022-06-28T12:45:36+5:30
शिवसेनेतील बंडखोर आमदारांची ईडीने चौकशी करावी अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे
औरंगाबाद: शिवसेनेतील बंडखोर आमदारांना कोट्यवधी रुपये देण्यात आल्याची चर्चा आहे. आता ईडीने यातही लक्ष घालावे. त्या दाढीकडे (एकनाथ शिंदे) एवढे पैसे कुठून आले, याची देखील ईडीने चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. पश्चिम व मध्य मतदारसंघातील बंडखोर आ.संजय शिरसाट, आ.प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधातील निषेध मेळाव्यात ते बोलत होते.
एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. शिंदे यांनी सेनेतील ४० आमदार सोबत असून हा आकडा ५० पर्यंत जाईल असा दावा केला आहे. यामुळे सुरुवातीला महाविकास आघाडी सरकार संकटात आल्याचे दिसत असले तरी आता शिवसेना पक्षच संकटात सापडला आहे. बंडखोर आमदारांनी वेगळा गट निर्माण करण्याची तयारी केली आहे. यासाठी विधानसभा अध्यक्षांना शिंदे यांनी पत्र देण्यात आले. या बंडखोरांमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदार आहेत. जिल्ह्यातील आमदारांना मोठ्या प्रमाणात विकास निधी, गिफ्ट्स आणि पैसे देऊन शिंदेनी आपलेसे केल्याचा आरोप सेनेतून करण्यात येतोय.
दरम्यान, बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसेनेने निषेध मेळावे घेणे सुरु केले आहे. सोमवारी औरंगाबाद मध्य आणि पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचा निषेध मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात नेते चंद्रकांत खैरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे, त्यांच्यासोबत गेलेले आमदार शिरसाट आणि जैस्वाल यांच्यावर हल्लाबोल केला. ३८३ कोटी रुपयांच्या बीड बायपासच्या रस्त्यात सात कोटी रुपये आ. शिरसाट यांनी घेतल्याचे कंत्राटदाराकडून समजले आहे. जैस्वालांनी पैसे घेऊन गद्दारी केली, असा आरोप खैरे यांनी केला. तसेच एकनाथ शिंदेंकडे एवढे पैसे कुठून आले याची ईडीने चौकशी करावी अशी मागणी देखील खैरे यांनी यावेळी केली.