रुग्णांचे कल्याण करणारी समिती गेली कुठे; कारवाई कोण करणार?

By विजय सरवदे | Published: June 20, 2024 05:51 PM2024-06-20T17:51:36+5:302024-06-20T17:52:14+5:30

जि.प. कार्यकारी मंडळ संपुष्टात : अडीच वर्षांपासून अधिकारीच कारभारी

Where did the patient welfare committee go; Who will take action? | रुग्णांचे कल्याण करणारी समिती गेली कुठे; कारवाई कोण करणार?

रुग्णांचे कल्याण करणारी समिती गेली कुठे; कारवाई कोण करणार?

छत्रपती संभाजीनगर : मागील अडीच वर्षांपासून जि.प. कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे जि.प. सदस्य हे अध्यक्ष असलेल्या रुग्ण कल्याण समितीची बैठकच झालेली नाही. सध्या या समितीच्या अध्यक्षपदाचा कारभार तालुका आरोग्य अधिकारी हे बघत आहेत. तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या नियमित बैठकीमध्येच रुग्ण कल्याण समिती अंतर्गत निधीतून करावयाच्या खर्चाबाबत निर्णय घेतले जातात.

रुग्ण कल्याण समिती ही नोंदणीकृत समिती असून राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून या समितीला दरवर्षी पावणेदोन लाख रुपयांचा निधी मिळतो. पण, अलीकडच्या काही वर्षांत जवळपास सव्वालाख रुपयांपर्यंत निधी दिला जात आहे. या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्रांत येणाऱ्या रुग्णांना सुविधा, आरोग्य केंद्रांचा किरकोळ स्टेशनरी खर्च, किरकोळ डागडुजी, औषधांवर खर्च केला जातो. या निधीचा योग्य वापर व्हावा, यासाठी नियंत्रण ठेवणारी समिती म्हणून रुग्ण कल्याण समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या समित्या कार्यरत आहेत. सर्वाधिक बाह्य रुग्ण सेवा देणाऱ्या खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी, फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार, सिल्लोड तालुक्यातील शिवना प्राथमिक आरोग्य केंद्रांत रुग्णांना उत्तम सोईसुविधा दिल्या जातात. त्या ठिकाणी प्रसूतीचे प्रमाणही तुलनेने अधिक असल्याचे दिसून आले.

 जिल्ह्यात ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रे
जिल्ह्यात ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी रुग्ण कल्याण समिती असून प्राप्त निधीच्या खर्चाचा आढावा तालुका आरोग्य अधिकारी हे नियमितपणे घेत आहेत.

 काय आहे रुग्ण कल्याण समिती?
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रुग्ण कल्याण समितीची स्थापना करण्यात येते. ही समिती नोंदणीकृत समिती असून, समितीचे अध्यक्ष हे त्या सर्लकचे जि.प. सदस्य, तर सचिवपदी संबंधित आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी असतात.

समितीचे कार्य काय?
राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून मिळणाऱ्या निधीतून प्रामुख्याने रुग्ण हा केंद्रबिंदू माणून त्यांना समाधानकारक व गुणवत्तापूर्ण सुविधा, आरोग्य केंद्रांचा किरकोळ स्टेशनरी खर्च, किरकोळ डागडुजी, औषधांवर खर्च केला जातो.

अडीच वर्षापासून बैठकच नाही 
प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजारसावंगी :
जि.प. सदस्याचा कार्यकाळ संपुष्टात आल्यापासून आता अडीच वर्ष होत आले. त्यामुळे खऱ्या अर्थाने समितीची बैठक नाहीच. अधिकाऱ्यांच्या बैठकीतच याबद्दल निर्णय घेतले जातात. तरीही खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी आरोग्य केंद्र हे गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देत असल्यामुळे येथील ओपीडी व प्रसूतीचे प्रमाण जास्त आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र, वडोदबाजार 
फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार आरोग्य केंद्रात अलीकडच्या तीन महिन्यांत ५ हजार ३५६ एवढी ओपीडी आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र, शिवना : सिल्लोड तालुक्यातील शिवना प्राथमिक आरोग्य केंद्रांने अलीकडच्या तीन महिन्यांत ७ हजार ६४६ रुग्णांवर ओपीडीद्वारे सेवा दिली आहे.

Web Title: Where did the patient welfare committee go; Who will take action?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.