कुठे आहे स्वातंत्र्य, समता व बंधुभाव?
By Admin | Published: April 9, 2016 12:40 AM2016-04-09T00:40:40+5:302016-04-09T00:54:03+5:30
औरंगाबाद : स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही या देशात कुठे आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव तसेच आरक्षण? असा सवाल उपस्थित करीत डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मुक्तसंवाद साधला.
औरंगाबाद : स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही या देशात कुठे आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव तसेच आरक्षण? असा सवाल उपस्थित करीत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी आज सायंकाळी तापडिया नाट्यमंदिरात औरंगाबादकरांशी मुक्तसंवाद साधला. तत्पूर्वी, त्यांनी औरंगपुरा येथील बलवंत वाचनालयाशेजारील श्रीहरी साफल्यमधील साकेत बुक वर्ल्डचे उद्घाटन केले.
बाबा भांडलिखित ‘स्वातंत्र्य योद्ध्याचे पाठीराखे- महाराजा सयाजीराव गायकवाड’ या नव्या ग्रंथाचे प्रकाशन नेमाडे यांच्या हस्ते झाले. जातीअंताच्या नावाखाली जातीच जोपासल्या जात आहेत आणि बंधुभाव म्हणजे जखमेवर मीठ चोळणे होय, असे विश्लेषण नेमाडे यांनी यावेळी केले. आरक्षणामुळे फायदा म्हणून काय होतो? असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी सांगितले की, आपला नंबर लागला नाही म्हणजे आरक्षणामुळे नाही लागला, असे म्हणण्याचे एक फॅड सुरू झाले आहे.
‘गुदमरून टाकणारे प्रेम...’
मुक्तसंवादास डॉ. भालचंद्र नेमाडे सुरू करणार एवढ्यात स्टेजच्या खालून आवाज आला. ‘थांब जरा’ आणि एक पांढरीशुभ्र दाढीधारी इसम स्टेजवर गेला. त्याने नेमाडेंना कडकडून मिठी मारली. ‘मला दोन मिनिटे बोलू दे’ असे म्हणत त्याने बोलायलाही सुरुवात केली. नेमाडेंच्या ‘बिढार’ कादंबरीतील हयात असलेले एक पात्र म्हणजे मी अजीम असे त्याने जाहीर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘आमची दाढी-मिशांची जोडी आहे. नेमाडेंनी आपल्या भारदस्त मिशांचा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण केला आहे,’ असे उद्गार प्रा. अजीम यांनी काढताच पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. पुढे या प्रसंगाचा उल्लेख आपल्या भाषणात नेमाडे यांनी केला. ‘मी औरंगाबादला वीस वर्षे राहिलोय. तो माझा उमेदीचा काळ होता. आता हे गुदमरून टाकणारं प्रेम... या गोष्टी अन्यत्र सापडत नाहीत,’ असे नेमाडे म्हणाले आणि सभागृहात हास्याची खसखस पिकली. गोखले, टिळक, सावरकर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्यांना मदत करणारे सयाजीराव गायकवाड हे आता सर्वश्रेष्ठ प्रतीक म्हणून प्रस्थापित करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन करून डॉ. नेमाडे यांनी सयाजीराव गायकवाड यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या क्रांतिकारी कार्याची ओळख करून दिली. गाडगेबाबा, साईबाबा, कैकाडी महाराज यांनी मराठी लोक पुढे नेले. मलिक अंबरने मराठे एकत्र केले होते. इतिहासात ही मंडळी नगण्य असली तरी त्यांचे कार्य मोठे असल्याचे त्यांनी नमूद केले. सयाजीरावांसह ही अशी माणसे बाजूला का पडली याचा नव्याने शोध घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. पुण्याचे संजय भास्कर जोशी यांचे यावेळी ‘ग्रंथव्यवहार आणि वाचन संस्कृती’ या विषयावर भाषण झाले. प्रकाशन व्यवसाय व्यवसाय म्हणून करा, व्यावसायिकतेचे संपूर्ण तत्त्व पालन करा, असा सल्ला त्यांनी दिला. बाबा भांड यांनी प्रास्ताविक केले. आशा भांड, धारा भांड, साकेत भांड आदींनी पाहुण्यांचा सत्कार केला. भांड परिवारातर्फे नेमाडे दाम्पत्याचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच आर्किटेक्ट रोहित सूर्यवंशी, रमेश तिरुखे व मामू यांचाही सत्कार करण्यात आला. नीता पानसरे यांनी सूत्रसंचालन केले.
पुरुषोत्तम खेडेकर, प्राचार्य रा.रं. बोराडे, अंकुशराव कदम, प्राचार्या छाया महाजन यांच्यासह साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्र व प्रकाशन व्यवसायातील मान्यवर उपस्थित होते.