कुठंय ग्रीन कॅरिडोर ? रुग्णवाहिकेला ११ कि.मी.साठी लागली ३२ मिनिटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 06:11 PM2020-12-01T18:11:23+5:302020-12-01T18:14:42+5:30
घाटीसह खाजगी रुग्णालयांत जाण्यासाठी जालना रोडवरून रुग्णवाहिकेला जावेच लागते.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जालना रोडवरून सायरन वाजवित जाणाऱ्या रुग्णवाहिकेसमोरील वाहने कधी अचानक वळण घेतात, तर कधी वाहतूक सिग्नलमुळे ब्रेक मारावा लागतो. सिग्नलवर वाहनचालक रस्ता देण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु वाहनांच्या रांगेत तेही अशक्य होते. अशा सगळ्या अडथळ्यांना पार करत चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयापासून घाटीत पोहोचताना ११ कि.मी.च्या अंतरासाठी ३२ मिनिटांचा कालावधी रुग्णवाहिकेला लागतो.
शहराची लाईफलाईन असलेल्या जालना रोडवरील वाहतूक कोंडीच्या ब्लाॅकेजचा रुग्णवाहिकांनाही फटका बसत आहे. घाटीसह खाजगी रुग्णालयांत जाण्यासाठी जालना रोडवरून रुग्णवाहिकेला जावेच लागते. चिकलठाणा ते घाटी या अंतरासाठी किती वेळ लागतो आणि रुग्णवाहिका चालकांना या रस्त्यावर कोणत्या अडचणीला सामोरे जावे लागते, याची ‘लोकमत’ ने पडताळणी केली.
मुंबईत लोकलमध्ये बसल्याशिवाय पर्याय नाही, तसेच औरंगाबादकरांना जालना रोडवर आल्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाला जालना रोडवर यावेच लागते. परंतु गेल्या काही वर्षांत वाढलेल्या वाहतुकीने या रस्त्यावर सर्वसामान्यांना चालणेही अवघड होत आहे. प्रत्येक चौकात वाहनास वाहतूक कोंडीत अडकावे लागते. रुग्णवाहिकेत जीवनाशी लढा देत असलेल्या रुग्णांचे काय हाल होत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी. अपघात, हृदय विकाराचा झटका, पक्षाघात, ब्रेन हॅमरेज अशा रुग्णांना वेळेत उपचार मिळाले तर त्यांचे प्राण वाचू शकतात. त्यांना रुग्णालयात वेळेत नेण्यासाठी रुग्णवाहिकांमधून नेले जाते, परंतु जालना रोडवर रुग्णवाहिकांना वेळेत पोहोचणे शक्य होत नाही. रुग्णवाहिका सहज जाऊ शकतील, यासाठी उपाययोजनांची गरज आहे, असे चालक किरण रावल म्हणाले.
१० चौकांतून प्रवास
जिल्हा रुग्णालयासमोरून निघाल्यानंतर घाटीत पोहोचेपर्यंत १० चौक पार करावे लागले. प्रत्येक चौकात रस्त्याच्या कधी डाव्या, तर उजव्या बाजूने वळण घेणाऱ्या वाहनांमुळे रुग्णवाहिकेचा वेग कमी करावा लागला. दुचाकी, चारचाकी चालक रस्ता मोकळा करून देण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु सिग्नल सोडल्याशिवाय रुग्णवाहिका पुढे जाऊच शकत नसल्याची स्थिती आहे.
संपूर्ण रस्त्यावर वाहने
सिग्नल सुटल्यानंतर सर्वात पुढे जाण्यासाठी रस्त्याच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यापर्यंत वाहने उभी केली जातात. उजव्या बाजूने पुढे जायचे ठरविले तरीही समोरील वाहने गेल्याशिवाय तेदेखील अशक्य होते. रुग्णवाहिका आल्यानंतर वाहतूक माेकळी करून देण्यासाठी धावपळ उडत असल्याचे पहायला मिळाले.