छत्रपती संभाजीनगरमधील कचरा जातोय तरी कुठे? महिनाभरात १ हजार मेट्रिक टन कचरा घटला
By मुजीब देवणीकर | Published: August 18, 2023 07:37 PM2023-08-18T19:37:06+5:302023-08-18T19:38:00+5:30
जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात १ हजार २४३ मेट्रिक टन कचरा घटल्याची धक्कादायक बाब समोर आली.
छत्रपती संभाजीनगर : मनपा प्रशासनाने १ ऑगस्टपासून ओला-सुका कचरा स्वीकारण्याचे धोरण पत्करले. ज्या भागातून मिक्स कचरा येईल, त्या भागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे कचरा वर्गीकरणाचे प्रमाण ९१ टक्क्यांपर्यंत गेले. मात्र, जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात १ हजार २४३ मेट्रिक टन कचरा घटल्याची धक्कादायक बाब समोर आली. नेमका हा कचरा जातोय कुठे याचा शोध महापालिकेकडून सुरू झाला आहे.
प्रशासक जी. श्रीकांत यांनी छत्रपती संभाजीनगर शहराला इन्दूरपेक्षाही सुंदर करण्याचा मानस व्यक्त केला. त्यासाठी ठोस पाऊल उचलण्यास सुरूवात झाली. ओला-सुका कचरा वेगळाच करून घेतल्या जातोय. त्यामुळे घंटागाडीतून येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण देखील घटल्याचे समोर आले आहे. महिनाभरात १ हजार २४३ मेट्रिक टन कचरा कमी आल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सोमनाथ जाधव यांनी सांगितले. ज्या भागात वर्गीकरण न करता कचरा दिला जातो, त्या भागात नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. कचऱ्यापासून खत कसे तयार होते. सुका कचरा कुठे पाठवला जातो, हे सांगितले जात आहे. कचरा वर्गीकरण आता ९१ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले. कचऱ्याचे प्रमाणही कमी झाल्याचे जाधव यांनी सांगितले. जून महिन्यात १५ हजार १० मे. टन कचरा आला. जुलै महिन्यात १३ हजार ७७५ मेट्रिक टन कचरा आल्याचे त्यांनी नमूद केले.
दुष्परिणाम आता समोर येत आहेत
कचऱ्याचे प्रमाण कमी झाले असले तरी अनेक भागात भीतीपोटी किंवा वर्गीकरण केलेला कचरा रस्त्यावर फेकला जाण्याची भीती आहे. त्यामुळे रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाया केल्या जाणार असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले. कचऱ्यात पूर्वी दगड, माती असू शकते. वजन वाढविण्यासाठी काहीही केले जाऊ शकते. त्यामुळे मूळ कारणांचा शोध घेतोय, असेही त्यांनी सांगितले.