१२५ कोटींच्या रस्त्यांची यादी कुठे आहे; मुख्यमंत्र्यांकडून उपमहापौरांना विचारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 07:40 PM2019-02-05T19:40:52+5:302019-02-05T19:41:40+5:30
चार दिवसांमध्ये यादी घेऊन मुंबईला येतो, असे उपमहापौरांनी आश्वासन दिले.
औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील महिन्यात शहरातील रस्त्यांसाठी १२५ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत रस्त्यांची यादीच तयार केली नाही. १२५ कोटींत कोणते रस्ते घ्यावेत यावरून जोरदार वाद सेना-भाजपमध्ये सुरू आहे. सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री चिकलठाणा विमानतळावर थांबले असता त्यांनी उपमहापौरांना रस्त्यांची यादी कुठे आहे...अशी विचारणा केली. चार दिवसांमध्ये यादी घेऊन मुंबईला येतो, असे आश्वासन त्यांनी दिले.
जून २०१७ मध्ये मुख्यमंत्र्यांनी शहरातील रस्त्यांसाठीच १०० कोटी रुपये दिले होते. या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यासाठी ३ जानेवारी २०१९ पर्यंत मुख्यमंत्र्यांना वाट पाहावी लागली. रस्त्यांची यादी, कामे कोणी करावीत यावरून वाद निर्माण झाले होते. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी शहराला १२५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपचे पदाधिकारी एकत्र बसून रस्त्यांची यादी तयार करायला तयार नाहीत. मनपा प्रशासनाने २०० कोटींची यादी पदाधिकाऱ्यांकडे सादर केली. सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी यादी तयार करण्याचे अधिकार मनपा पदाधिकाऱ्यांना दिले. पदाधिकारी एकत्र बसत नाहीत. त्यामुळे यादी तयार होण्यास विलंब होत आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने जालना येथे येत आहेत.
सोमवारी सायंकाळी ते विमानतळावर थांबले होते. यावेळी त्यांनी भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनाच यादीसंदर्भात विचारणा केली. चार दिवसांमध्ये यादी तयार करून मुंबईला घेऊन येणार असे आश्वासन त्यांनी दिले. रस्त्यांची यादी करणार असे अनेकदा मनपा पदाधिकाऱ्यांनी घोषित केले. मात्र, प्रत्यक्षात यादी तयार करण्यात अनेक विघ्न येत आहेत.