यातच माझे सौख्य सामावले आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:12 AM2018-01-24T00:12:45+5:302018-01-24T16:55:28+5:30
पक्ष आणि संसदेच्या कामकाजात सक्रिय सहभाग, विविध विषयांवरील बैठकांचा धडाका तसेच अधिका-यांवर असणारी पकड अशा विविध गुणांमुळे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ठाकरे घराण्याशी आणि पक्षाशी असणारी त्यांची एकनिष्ठता. या बळावरच खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे पक्षाचे नेतेपद आले असल्याचे स्पष्ट होत आहे.
- नजीर शेख
औरंगाबाद : पक्ष आणि संसदेच्या कामकाजात सक्रिय सहभाग, विविध विषयांवरील बैठकांचा धडाका तसेच अधिका-यांवर असणारी पकड अशा विविध गुणांमुळे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ठाकरे घराण्याशी आणि पक्षाशी असणारी त्यांची एकनिष्ठता. या बळावरच खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे पक्षाचे नेतेपद आले असल्याचे स्पष्ट होत आहे.
१९९० साली चंद्रकांत खैरे विधानसभेवर निवडून आल्यानंतर गेली २७ वर्षे ते संसदीय राजकारणात आहेत. दीर्घकाळ संसदीय राजकारणात राहणा-या मराठवाड्यातील नेत्यांमध्ये खा. खैरे यांची गणना होऊ शकते. औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचा ख-या अर्थाने ते एकखांबी तंबू आहेत आणि या खांबाचे पाय भक्कमपणे रोवले गेले आहेत. या भक्कमपणाचा वापर त्यांनी पक्षांतर्गत तसेच पक्षाच्या बाहेरील विरोधकांना मात देण्यासाठी केला.
आपणाला नेतेपद मिळावे किंवा मिळायला हवे होते, असा शब्द त्यांच्या तोंडून आला नाही. शिवाय पक्षाशी बेईमानी किंवा बंडाची भाषा त्यांच्या तोंडी आली नाही. आमदार आणि राज्यातील मंत्रिपदानंतर त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली ती त्यांनी कोणतीही तक्रार न करता स्वीकारली. काँग्रेसच्या राज्यातील व केंद्रातील सत्तेच्या काळातही त्यांनी जिल्ह्यात आपली छाप कायम ठेवली.
केंद्रात मंत्रिपद मिळावे, ही अपेक्षा ते बाळगून होते. ते त्यांना मिळाले नाही. मात्र, पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडण्याची भूमिका त्यांनी सातत्याने पार पाडली आणि शेवटी त्याचे फळ त्यांना मिळत गेले. पक्षाच्या नेत्यांमध्ये खा. खैरे यांचा समावेश होणे हे त्यांच्या पक्षातील कारकीर्दीचे हिमशिखरच आहे. यापुढे पक्षात मोठे पद म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख हेच आहे.
अनेकांना संपविले
१९९९, २००४, २००९ आणि २०१४ अशा चार वेळा लोकसभा निवडणूक जिंकलेले खा. चंद्रकांत खैरे हे दर्शनी प्रकृतीने धुरंधर, कुटिल किंवा किमयागार राजकारणी आहेत, असे अजिबात वाटत नाही. मात्र, त्यांनी पक्षातील अनेक मातब्बरांना धोबीपछाड दिली आहे. दिवंगत खासदार मोरेश्वर सावे, प्रदीप जैस्वाल, दिवाकर रावते, विलास अवचट, विनोद घोसाळकर आणि काही दिवसांपूर्वीच औरंगाबादचे पालकमंत्रीपद गेलेले पालकमंत्री रामदास कदम यांच्यावर खैरेंनी मात केली आहे. ते त्यांना कसे जमते, असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो.
बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध
आपल्या बेधडक वक्तव्यासाठी ते प्रसिद्ध आहेतच. एखाद्या व्यक्तीबद्दलचा त्यांचा राग लगेच उफाळून येतो, हे दिवंगत खासदार मोरेश्वर सावे, दिवाकर रावते, रामदास कदम यांच्याबाबतीत दिसून आले आहे. याशिवाय महापालिका आयुक्त हर्षदीप कांबळे, पोलीस आयुक्त संजीवकुमार यांनीही त्यांचा राग अनुभवला आहे. अगदी शांतीगिरी महाराजांची पिसे काढण्यासही ते मागेपुढे पाहत नाहीत. खासदार म्हणून त्यांनी काय काम केले, असा खोचक प्रश्न त्यांच्याविषयी विचारला जातो. मात्र, मी काँग्रेसच्या काळात ‘समांतर पाणीपुरवठा आणि भूमिगत जलवाहिनी’ अशा दोन योजना आणल्याचे ते सांगतात. केंद्र व राज्यातील सरकारचे शहराकडे दुर्लक्ष झाल्याचे ते बोलून दाखवितात.
अनेक अंदाज चुकविले
खा. खैरे यांची पत घसरली, खैरे यांचे पंख छाटले जाणार, भ्रष्टाचार प्रकरणांमुळे खैरे अडचणीत असे अनेक अंदाज राजकीय आणि पक्षीय पातळीवर वर्तविले गेले. मात्र, या सर्वांचे अंदाज खैरे यांनी चुकविले. पक्षातील अंबादास दानवे, राजेंद्र जंजाळ आणि भाजपचे संजय केणेकर यांनी त्यांच्याविरुद्ध बंडाची भाषा करताच प्रसंगी खैरे हातघाईवरही आले. ज्येष्ठांच्या पाया पडणे, धर्मगुरूंसमोर नतमस्तक होणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मातोश्रीचा आशीर्वाद कसा कायम राहील, याची अनेक वर्षांपासून त्यांच्याकडून घेण्यात आलेली दक्षता यातच त्यांचे सौख्य सामावले आहे.