जेथे गुंडगिरी केली, तेथेच पोलिसांनी 'धिंड' काढली

By सुमित डोळे | Published: July 22, 2023 10:28 PM2023-07-22T22:28:42+5:302023-07-22T22:30:56+5:30

गारखेड्यातील ‘गँगवॉर’नंतर पुंडलिकनगर पोलिसांना अखेर जाग

Where there was hooliganism, the police took out 'Dhind' | जेथे गुंडगिरी केली, तेथेच पोलिसांनी 'धिंड' काढली

जेथे गुंडगिरी केली, तेथेच पोलिसांनी 'धिंड' काढली

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : वर्चस्ववादातून रोज गुंडगिरी, टुकारपणा करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, तेथेच मित्र, कुटुंबासमोरून हातकड्यांसह गुन्हेगारांची धिंड काढण्यात आली. पाच दिवसांपूर्वी गुन्हेगारांच्या टोळ्याने एकमेकांवर शस्त्रांसह हल्ला केला. यातील सहा गुन्हेगारांना अटक केल्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांना इशारा देण्यासाठी शनिवारी दुपारी हे कडक पाऊल उचलले. इतर वेळी कॉलर वर करून फिरणाऱ्या मस्तवालांच्या माना यावेळी खाली गेल्या होत्या.

गारखेड्यातील मेहरसिंग नाईक महाविद्यालयासमोर १७ जुलै रोजी गुन्हेगार पुन्हा एकमेकांशी भिडले. एकेकाळी दुर्लभ कश्यपला आदर्श समजणारा गुन्हेगार राजू पठाडे यात गंभीर जखमी होऊन चॉपरच्या हल्ल्यात त्याच्या उजव्या गालाचे संपूर्ण मांस निघून डोळा निकामी झाला. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या नितीन जाधवने हा प्रकार केला. जाधव घटनेनंतर पसार झाला. त्याच्या टोळीतील आकाश रतन वनपुरे (२७), प्रेम आसाराम सपाटे (३३), सूरज भगवान खंडागळे (३०), अमोल बळीराम वाघमारे (३२), शुभम भास्कर त्रिभुवन (२९) यांना तर राजूच्या टोळीतील तुषार संजय पाखरे याला अटक करण्यात आली. पुंडलिकनगरच्या पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी परिसरातील हे गुंडगिरीचे ‘भूत’ उतरवण्यासाठी गुन्हेगारांची धिंड काढण्याचे ठरवले. शनिवारी दुपारी दोन वाजता आरोपी राहत असलेला परिसर, हल्ला केलेल्या महाविद्यालय परिसरातून हातकडीसह फिरवले. गेल्या अनेक महिन्यांपासून परिसरात अशा अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. जालना, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, बीड, परळी येथील स्वयंघोषित ‘दादां’ना ते आदर्श मानतात. ते गुंड देखील यांना आर्थिक रसद पुरवतात.

आता लक्ष्य टिप्या
कुख्यात गुन्हेगार शेख मकसूद उर्फ टिप्या याने पुन्हा चाकू लावून एकाला लुटले. त्याच्यावर यापूर्वी देखील खून, खुनाचे प्रयत्न, अधिकाऱ्यांवर हल्ले, लूटमार, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वीच तो एमपीडीएतून बाहेर आला. मात्र, पुन्हा गुन्हे सुरू केले. अनेक हॉटेल, बारमध्ये दादागिरी केली. त्यामुळे टिप्यावर गंभीर कारवाई करून कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याच्या तयारीत पोलिस असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या अनुषंगाने पोलिसांनी तयारी सुरू केली असून त्याचा शोध सुरू आहे.

Web Title: Where there was hooliganism, the police took out 'Dhind'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.