कुठे फुकटच्या पाणीपुरीसाठी भोसकले, तर कुठे सोबत का राहत नाही विचारत जीवघेणा हल्ला
By राम शिनगारे | Published: May 2, 2023 07:37 PM2023-05-02T19:37:40+5:302023-05-02T19:37:55+5:30
किरकोळ वादातून घडले प्रकार. दोन ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : किरकोळ वादातुन कुठे चाकुने भोसकले, तर कुठे जिवघेणा हल्ला करण्यात आला. हल्ला करणारे आणि झालेले दोन्ही ओळखीचे होते. या प्रकरणांमध्ये जिन्सी आणि उस्मानपुरा पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविला आहे.
सोबत राहण्यासाठी चाकूने वार
'तु मेरे साथ क्यु नही रहेता, ज्यादा मस्ती मे आया क्या, तु सोहेल बागवान के साथ क्यु रहेता है, तुझे और सोहेल को जान से मार दुंगा' असे म्हणून आमेर खान पाशु खान (रा. बायजीपुरा) याने फिर्यादी शेख अबुजर शेख अय्युब (रा. हर्सुल) यांच्या मानेवर, हातांवर आणि पाठीवर चाकूने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना २७ एप्रिल रोजी बायजीपुऱ्यात घडली. या प्रकरणी १ मे रोजी जिन्सी ठाण्यात आमेरच्या विरोधात गुन्हा नोंदवला.
जमावाचा युवकावर हल्ला
तुझ्या मुलाला बोलावुन घे, त्याने चुकी केली आहे. त्याला माफी मागायला लावायची आहे, असे म्हणत दहा जणांच्या टोळक्याने एकावर जिवघेणा हल्ला केला. यात फिर्यादी आरेफ देशमुख (रा. कटकट गेट, बाबर कॉलनी) यांचा मुलगा अबरार हा गंभीर जखमी झाला. तर त्यांचा मेहुणा जावेद खान यासही चाकू लागला. याप्रकरणी आरेफ यांच्या तक्रारीवरून हुसेन खान उर्फ बब्बु, सैफ अब्बास खान, शहबाज हुसेन खान, हुसेन खानचा भाचा सोहेल, फैसल, फुरखान, नातेवाईक साद, रेहान, हारुण यांच्यासह हुसेनच्या जावायाच्या विरोधात जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंदवला. ही घटना ३० एप्रिल रोजी रात्री ११ वाजता घडली.
फुकटच्या पाणीपुरीसाठी भोसकले
आम्हाला फुकट पाणीपुरी द्यायची तरच येथे गाडी लावायची असे म्हणत सय्यद शहजाद सय्यद अल्लु (रा.फुलेनगर, उस्मानपुरा), शेख अन्सार उर्फ इल्ली शेख सत्तार (रा.शहानुरवाडी) आणि शेख शाहरुख उर्फ जॉकी शेख वाहिद (रा. छोटा आशुर खाना, उस्मानुपरा) या तिघांनी पाणीपुरीवाल्यास शिवीगाळ करीत मारहाण सुरू केली. तेव्हा पाणीपुरीवाल्याचे काका पुरणसिंग यादव (रा. शहानुरवाडी) हे भांडण सोडविण्यास आले. तेव्हा तीन आरोपींनी त्यांना पकडून चाकूने भोसकले. ही घटना ३० एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता प्रतापनगर येथे घडली. या प्रकरणी उस्मानुपरा ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदवला.