फटाके कोठून घेणार? छत्रपती संभाजीनगरात दहा ठिकाणी फटाक्यांची विक्री
By मुजीब देवणीकर | Published: November 8, 2023 05:25 PM2023-11-08T17:25:52+5:302023-11-08T17:26:42+5:30
ना हरकत प्रमाणपत्र, परवानगीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
छत्रपती संभाजीनगर : दिवाळी म्हटले की, फटाक्यांची आतषबाजी आलीच. शहरात यंदा दहा ठिकाणी फटाका बाजाराला परवानगी देण्यात येत आहे. त्यासाठी अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे. कर्णपुरा मैदान, लेबर कॉलनी, सातारा परिसर, शिवाजीनगर, केंब्रिज शाळा, कलाग्राम, छावणी, टीव्ही सेंटर मैदान, वाळूज, पंढरपूर अशा एकूण दहा ठिकाणी फटाक्यांची दुकाने लावण्यात येणार आहेत.
दिवाळीच्या खरेदीसाठी शहराच्या मुख्य बाजारपेठांमधील रस्त्यांवर पाय ठेवायलाही जागा नाही. गुलमंडी, सिटी चौक, रंगारगल्ली, कुंभारवाडा, पैठण गेट, औरंगपुरा, टीव्ही सेंटर, गारखेडा, शिवाजीनगर आदी ठिकाणी खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. शहराच्या आसपास आणि बाहेरगावहून खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक येत आहेत. शहरात काही वर्षांपूर्वी औरंगपुरा येथे फटाका बाजाराला आग लागली होती. त्यामुळे अत्यंत सावधगिरी बाळगत फटाक्यांच्या दुकानांना परवानगी देण्याची प्रक्रिया प्रशासक जी. श्रीकांत यांच्या सूचनेनुसार सुरू आहे. अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्रासह परवानगी देण्याची कार्यवाही सुरू आहे.
कर्णपुरा येथे सर्वाधिक ६५ स्टॉल लावण्यात येणार आहेत. कलाग्राम येथे ५०, टीव्ही सेंटर येथील मैदानावर ४१, सातारा परिसर २३, अन्य ठिकाणी कमी स्टॉल राहतील असे अग्निशमन विभागाने सांगितले. दोन दुकानांमध्ये अंतर ठेवावे, वाळू, पाणी आदीची व्यवस्था दुकानदारांनी करावी, अशा सूचना देण्यात येत आहेत. जास्त दुकाने असतील तेथे अग्निशमन विभागाच्या पाण्याचा बंबही तैनात राहणार आहे. दिवाळीसाठी फटाका असोसिएशनच्या वतीने फटाक्यांची खरेदी करण्यात आली असून, आतापर्यंत कर्णपुरा येथे चार कोटींचे फटाके मागविण्यात आले आहेत. आणखी चार कोटींचे फटाके दोन दिवसांत येणार असल्याचे कर्णपुरा येथील असोसिएशनचे पदाधिकारी गोपाल कुलकर्णी, डी. के. खामगावकर यांनी सांगितले.