खैरलांजीच्या वेळी सुप्रिया सुळे कुठे होत्या ?; अंजली आंबेडकर यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 05:29 PM2020-02-26T17:29:33+5:302020-02-26T17:39:24+5:30
वंचित बहुजन आघाडीच्या महिला अत्याचारविरोधी परिषदेत सवाल
औरंगाबाद : अगदी अलीकडे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिला अत्याचारप्रकरणी मोर्चा काढणाऱ्या सुप्रिया सुळे खैरलांजी प्रकरण घडले तेव्हा कुठे होत्या, असा खडा सवाल मंगळवारी अंजली आंबेडकर यांनी येथे वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीने आयोजित केलेल्या महिला अत्याचारविरोधी परिषदेत उपस्थित केला.
वासंती मंगल कार्यालय, बीड बायपास रोड येथे दुपारी या मेळाव्याचे उद्घाटन अत्याचारित महिलांच्या मुली-बहिणी व कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोणत्याच पाहुण्यांना हार- तुरे घालून सत्कार करण्याचा कार्यक्रम टाळण्यात आला. मेघानंद जाधव व संचाने बुद्ध-भीमगीते गाऊन वातावरण चैतन्यमय बनविले होते. जिल्हाध्यक्षा अॅड. लता बामणे यांनी प्रास्ताविक केले, तर शहराध्यक्षा वंदना नरवणे यांनी आभार मानले. संग्राम मोरे व मानवता रक्षक ग्रुपतर्फे पंकज बनसोडे यांनी अंधारी व डोंगरगाव येथील पीडितांच्या नातेवाईकांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले. विविध खेळांमध्ये नैपुण्य प्राप्त केलेल्या महिला खेळाडूंचा अंजली आंबेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी फिरदोस फातेमा खान यांंनी मोदी-शहांवर कडाडून टीका केली व कन्हैयाकुमारच्या स्टाईलमध्ये ‘आझादी’चे गीत आळवले. सरस्वती हरकळ व अरुंधती सिरसाठ यांची भाषणे झाली.
स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीत भारताचा जगात खूप खालचा क्रमांक आहे. गर्भात असल्यापासूनच मुलीवर अन्याय सुरू होतो. पितृसत्ताकमुळे स्त्रीला दुय्यम स्थान मिळते. महिलांवरील अत्याचाराचे मूळ जातिव्यवस्थेत आहे. जातिव्यवस्थेची काळी किनार या अन्याय-अत्याचारांना असतेच, असे अंजली आंबेडकर म्हणाल्या, तर रेखा ठाकूर या राष्ट्रवादी काँग्रेसवर तुटून पडल्या. भीमा-कोरेगाव प्रकरण घडले. त्या परिसरात सर्व ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. हे शरद पवार कसे विसरत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अॅड. बी.एच. कांबळे, संदीप शिरसाट, कृष्णा बनकर, अॅड. डी. व्ही. खिल्लारे, सिद्धार्थ मोकळे आदींसह मोठ्या संख्येने महिला व पुरुषही या मेळाव्यास उपस्थित होते.
जिल्हाध्यक्षांबद्दल तक्रार...
वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अलीकडेच बदलण्यात आले आहेत. जिल्हाध्यक्ष योगेश बन यांच्याविरुद्ध एक महिला तक्रार घेऊन मंचावर पोहोचली होती. मात्र, नंतर तिला बाजूला करून तिचे म्हणणे ऐकून घेतले गेले. काही दिवसांपूर्वी सुभेदारी गेस्ट हाऊसवरही निरीक्षकांच्या समोर बन यांच्याविरुद्ध तक्रार झाली होती. महिला अत्याचारविरोधी परिषदेत वंबआच्या जिल्हाध्यक्षाबद्दलच महिला तक्रार घेऊन येते याची चर्चा सुरू झाली आहे.