कुठे कुठला उद्योग? काहीच कळेना रे! चिकलठाणा औद्योगिक परिसरात जायचे कसे रे भौ?
By साहेबराव हिवराळे | Published: March 25, 2023 08:09 PM2023-03-25T20:09:44+5:302023-03-25T20:10:25+5:30
चिकलठाणा उद्योजकांचा सवाल : अधिकारी केव्हा लक्ष देणार ?
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा औद्योगिक परिसरातील विविध सेक्टरचे लेआऊट आणि कोणता कारखाना कुठे, असे दर्शविणारे फलक कोरे झाले असून, याकडे एमआयडीसीचे दुर्लक्ष असल्याने येणाऱ्यांना मात्र कारखाना शोधण्यासाठी अनेक फेऱ्या माराव्या लागत आहेत.
चिकलठाणा एमआयडीसी ही जुनी औद्योगिक वसाहत असून, एकेकाळी अत्यंत भरभराटीस असलेल्या वसाहतीकडे आता दुर्लक्ष केले जात आहे. औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या मुकुंदवाडी, ओक्खार्ड टी पाॅइंट, घाडगे पाटीलजवळील कॉर्नर गॅस कंपनीसमोर, इ. प्रमुख ठिकाणी पथदर्शक फलकावरील नकाशांवरील अक्षरे, चिन्हे मिटली आहेत. यामुळे बाहेरून येणाऱ्या मालवाहू चालकांना तसेच अभ्यागतांना कारखाने व कार्यालय सापडत नाही. एमआयडीसीच्या एका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की, वरिष्ठांशी बोलून फलकाविषयी पुढील निर्णय घेतला जाईल.
कारखान्याचे लोकेशन दर्शविणारे बोर्ड रंगवा...
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत येणाऱ्यांना कारखाना तसेच कार्यालयाचे लोकेशन तसेच सेक्टर दर्शविणारे बोर्ड असल्यास अधिकचे इंधन जाळण्याची गरज पडत नाही. दिवसा तर कुणीही पत्ता सांगते; परंतु रात्री अडचणीला तोंड द्यावे लागते. त्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
- मधुकर खिल्लारे, कामगार नेता
चिकलठाणा वसाहतीत साईनबोर्ड लावा..
नुकतीच जी-२०च्या स्वागतासाठी शहर सजविले होते, याच जालना रोडवरून चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या रस्त्यावर तसेच विविध सेक्टरला नकाशाफलक लावण्यात आलेले आहेत. तसेच ग्लोसेमचे साइनबोर्ड लावून सेक्टरचे नकाशे दाखवावेत; म्हणजे बाहेरून येणाऱ्यांना गुगल मॅप सतत पाहण्याची गरज पडणार नाही. याविषयी एमआयडीसीला पत्र देणार आहोत.
- राहुल मोगले, सचिव, मसिआ