औरंगाबादमध्ये लॉकडाऊन करायचा का हे बैठकीनंतरच ठरेल;जिल्हाधिकाऱ्यांकडून महत्त्वाचा खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 02:27 PM2021-03-06T14:27:41+5:302021-03-06T14:31:56+5:30
Lockdown in Auranagabad ? रविवारी संध्याकाळी माझ्या निवासस्थानी मनपा, पोलीस प्रमुखाची बैठक होईल. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल.
औरंगाबाद : शहरात कोविड रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट हा १२ ते १५ टक्क्यांवर पोहोचल्यामुळे शहरातील कोरोना संसर्गाचा विळखा घट्ट होत चालला आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा लॉकडाऊन करण्याची चाचपणी करत आहे. यावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी महत्वाचा खुलासा केला असून औरंगाबादमध्ये लॉकडाऊन करण्याबाबत रविवारी होणाऱ्या बैठकीनंतरच ठरेल असे म्हटले आहे.
शहरात बाधित रुग्णांची संख्या २ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. मार्चच्या २ तारखेपासून हा आकडा ३०० वर गेला आहे. तीन दिवसातच एक हजारापेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. शहरात दररोज किमान दोन हजार नागरिकांची तपासणी होत आहे. बाधित रुग्ण निघण्याचा रेट हा १२ ते १५ टक्के इतका आहे. साधारणपणे ५ टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असेल तर कोरोना संसर्ग आटोक्यात असल्याचे मानले जाते. यामुळे प्रशासकीय यंत्रणा लॉकडाऊनची चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. यावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी महत्त्वाचा खुलासा केला असून कोरोनासंसर्ग किती वाढला आहे, त्याचे मूल्यांकन होईल. यानंतर लॉकडाऊन करायचे की नाही, याबाबत जिल्हा आपत्ती निवारण प्रमुख म्हणून मी निर्णय जाहीर करेल असे म्हटले आहे. यासोबतच .लोकांच्या डोक्यात दगड घातल्याप्रमाणे निर्णय होणार नसल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.
''मी रविवारी रुजू होईल. रविवारी संध्याकाळी माझ्या निवासस्थानी मनपा, पोलीस प्रमुखाची बैठक होईल. लोकांच्या डोक्यात दगड घातल्या प्रमाणे निर्णय होणार नाही. लॉकडाऊन करण्याचा निर्णय एकट्याने घ्यायचा नसतो. याबाबत जे काही होईल, ते बैठकीनंतर होईल. लोकांना त्रास होईल असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. कोरोनासंसर्ग किती वाढला आहे, त्याचे मूल्यांकन होईल. यानंतर लॉकडाऊन करायचे की नाही, याबाबत जिल्हा आपत्ती निवारण प्रमुख म्हणून मी निर्णय जाहीर करेल.
- सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, औरंगाबाद.''