जावईबापूला कोणता धोंडा देणार, सोन्याचा की चांदीचा !

By प्रशांत तेलवाडकर | Published: July 1, 2023 01:01 PM2023-07-01T13:01:58+5:302023-07-01T13:02:18+5:30

सराफा बाजारात कारागीर लागले ‘धोंडा’ बनवायला

Which dhonda to give to son-in-law, gold or silver! | जावईबापूला कोणता धोंडा देणार, सोन्याचा की चांदीचा !

जावईबापूला कोणता धोंडा देणार, सोन्याचा की चांदीचा !

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : सर्व जावई धोंड्याच्या (अधिक मास) महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण, हा महिना जावयांसाठी खास असतो. सासरे आपल्या ऐपतीनुसार जावईबापूला अनारशाचे धोंडे, किंवा काही जण चांदीचे तर कोणी सोन्याचे ‘धोंडे’ देतात. मुख्य लग्नसराई संपली असून ‘ धोंड्या’ मुळे सराफा बाजारातील कारागिरांच्या हाताला काम मिळाले आहे.

१९ वर्षांनंतर श्रावणात अधिकमास
दर तीन वर्षांनंतर अधिकचा महिना येत असतो. यामुळे यंदा १३ महिन्यांचे वर्ष असणार आहे. उल्लेखनीय म्हणजे तब्बल १९ वर्षांनंतर अधिक महिना श्रावण महिन्यात आहे.

धोंड्याचा महिना नेमका कोणता
दोन महिन्यांचा ‘श्रावण’ आहे. त्यात नेमका धोंड्याचा महिना कोणता, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. धोंड्याच्या महिन्याला ‘पुरुषोत्तम मास’ असेही म्हणतात. श्रावणातील पहिला महिना म्हणजे १८ जुलै ते १६ ऑगस्ट हा ‘धोंड्या’चा महिना असणार आहे.
- प्रवीण कुलकर्णी, गुरुजी

जावयाला का देतात धोंडे ?
अधिक मासाचे स्वामी भगवान विष्णू आहेत. मुलगी आणि जावई हे ‘लक्ष्मी-नारायण’ म्हणून ओळखले जातात. यामुळे धोंड्याच्या महिन्यात मुलगी व जावई यांना जेवणाचे खास आमंत्रण दिले जाते. त्यात ‘धोंडे दान’ केले जातात. चांदीच्या किंवा तांब्याच्या तबकात तुपात तळलेले तेहतीस अनारसे दिले जातात. अनारसे नसतील तर बत्तासे, म्हैसूरपाक देखील दिले जाते. पुरणाचे धोंडे केले जातात.

चांदी, सोन्याचे धोंडे
अनेक जण जावयाला हौसेने चांदीचे किंवा सोन्याचे धोंडेही देतात. असे देणे सक्तीचे नाही. ऐपत व इच्छेनुसार दिले जाते.
- गिरधरभाई जालनावाला, व्यापारी

प्रत्येक दुकानात १५० ते २०० धोंडे ठेवतात तयार
धोंड्याच्या महिन्यात मागणी लक्षात घेता प्रत्येक ज्वेलर्स १५० ते २०० धोंडे तयार ठेवतात. यात चांदीचे धोंडे अधिक असतात. आजघडीला शहरात लहान-मोठे ३५० ज्वेलर्स असून शहरात ६० ते ७० हजारच्या जवळपास धोंडे विक्रीला ठेवले जातील.
- राजेंद्र मंडलिक, अध्यक्ष, सराफ असोसिएशन

चांदीच्या धोंड्यांचा भाव काय ?
१) चांदीचा भाव ६९५०० रुपये किलो आहे.
२) धोंडे (लहान आकार) २५ रुपये नग
३) धोंडे (मध्यम आकार) ३२ रुपये नग
४) धोंडे (मोठा आकार) ४० रुपये नग

सोन्याचे धोंडे
१) सोन्याचा भाव ६०२०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
२) धोंडे (लहान आकार) ४८० रुपये नग
३) धोंडे (मध्यम आकार) ७५० रुपये नग
४) धोंडे (मोठा आकार) १५०० रुपये नग

Web Title: Which dhonda to give to son-in-law, gold or silver!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.