जेवण बनवताना कोणती भांडी आरोग्यासाठी चांगली? फायदा, तोटा समजून घ्या
By प्रशांत तेलवाडकर | Published: October 24, 2022 12:40 PM2022-10-24T12:40:36+5:302022-10-24T12:41:15+5:30
काळजी घ्या नाही तर सामोरे जावे लागेल आजारांना
औरंगाबाद : स्वयंपाकघरात तुम्ही कोणत्या धातूच्या भांड्यात स्वयंपाक करीत आहात, त्यांचा काय फायदा, काय तोटा यांचाही विचार केला पाहिजे. कारण त्याचा आरोग्यावरही मोठा परिणाम होतो. अशी अनेक धातू आहेत ज्यात स्वयंपाक केल्याने अन्नपदार्थांचे पोषक घटकच नष्ट होत नाहीत, तर ते शरीरासाठी विषारीदेखील बनतात. त्यामुळे अशी भांडी न वापरलेली बरी, असे तज्ज्ञांनी सांगितले.
चांगल्या आरोग्याचा महामार्ग स्वयंपाकघरातून म्हणजे आहारातून जात असतो. दिवसभराचा कामाचा धावपळ आणि त्यातून असणारी आव्हाने या संपूर्ण परिस्थितीला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी चांगला आहार तितकाच फायद्याचा पर्याय ठरतो. प्रत्येक जण आपापल्यापरीने शक्य असेल त्या सोयी-सुविधांनी अन्नपदार्थ तयार करतात. यासाठी भांडी कोणती वापरली जातात, याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. बऱ्याच भांड्यांमध्ये असणारे घटक पदार्थांची चव वाढविण्यासोबच त्यांच्यातील पोषक तत्त्वांमध्येही भर टाकत असतात. काही भांडी शरीराला अपायकारक ठरण्याची शक्यता असते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
स्टील : स्वयंपाकासाठी सर्वांत सहज उपलब्ध आणि उत्तम भांडी म्हणजे स्टेनलेस स्टीलची. त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि चमकदार आहे, ज्यामुळे ते अधिक चांगले मानले जाते. स्टेनलेस स्टील कोणत्याही प्रकारे हानिकारक नाही, परंतु या धातूचा चांगलेपणा त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. बनावट स्टेनलेस स्टीलची भांडी आरोग्यासाठी हानीकारक असू शकतात.
ॲल्युमिनिअम : जुनी, पारंपरिक म्हणून वापरलेली ॲल्युमिनिअमची भांडी आता मागे पडू लागली आहेत. ॲल्युमिनिअमची भांडी क्वचितप्रसंगी आणि थोड्या वेळासाठी वापरले, तर त्याचे लगेच दुष्परिणाम होत नाहीत, परंतु कायमच या भांड्यांमध्ये अन्न शिजवून दीर्घकाळ सेवन होत असेल, तर ते मेंदूसाठी अहितकर आहे. विसराळूपणा, मेंदूची नेहमीची काम करण्याची क्षमता कमी होणे, अल्झायमर हा आजार या धातूच्या अतिवापराचा दुष्परिणाम ठरू शकतो.
तांबे : तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे सुरक्षित मानले जाते. या धातूला उच्च तापमानात गरम करणे टाळावे लागते. कारण ते अग्नीवर वेगाने प्रतिक्रिया देते. उच्च उष्णतेवर तांब्याच्या भांड्यात मीठ आणि आम्ल मिसळल्यामुळे अनेक प्रकारची रसायने तयार होऊ लागतात. त्यामुळे अन्नपदार्थ या भांड्यात करू नये, असे तज्ज्ञांनी सांगितले.
लोखंड : चांगल्या दर्जाची लोखंडी भांडे वापरणे फायदेशीर ठरू शकते. लोहाची कमतरता असणाऱ्या व्यक्तींना अशा भांड्यातील अन्नपदार्थ फायदेशीर ठरू शकतात, मात्र ही भांडी गंज लागलेली नसावी. त्यादृष्टीने लक्ष दिले पाहिजे.
मातीची भांडी : मातीची भांडी स्वयंपाकासाठी सर्वांत सुरक्षित आणि उत्तम पर्याय आहे. मातीची भांडी त्यांच्या खास शैलीमुळे खूप लोकप्रिय होत आहेत, मात्र स्वयंपाक करायला खूप वेळ लागतो आणि ती सांभाळणेही कठीण असते. म्हणूनच अनेकांना मातीच्या भांड्यात अन्न शिजविणे अवघड जाते.
भांडी महत्त्वपूर्ण
ॲल्युमिनिअमची भांडे वापरता कामा नये. या भांड्यात तयार केलेले अन्नपदार्थ सतत सेवन केल्यास काही आजारांना सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. चांगल्या प्रतीच्या लोखंडी भांड्यात अन्नपदार्थ तयार करणे हे लोहाची कमतरता भरू काढण्यासाठी फायदेशीर ठरते.
- मंजू मंठाळकर, आहारतज्ज्ञ
नैसर्गिक आहार उत्तम
नैसर्गिक आहार केव्हाही चांगला आहे. कारण साखर, मीठ यांचा वापर आला की आजार आला, अशी परिस्थिती आहे. प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा आरोग्यावर काही ना काही परिणाम होतो. त्यामुळे नैसर्गिक आहार अधिक फायदेशीर ठरतो.
- डाॅ. प्रवीण सूयवंशी, उपाधिष्ठाता, एमजीएम हाॅस्पिटल