दिल्लीतील तज्ज्ञांकडून पाहणी करताना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:02 AM2021-06-06T04:02:01+5:302021-06-06T04:02:01+5:30
नादुरुस्त व्हेंटिलेटर्स दुरुस्तीचा खटाटोप व्हेंटिलेटर्सची चाचणी : घाटीपाठोपाठ खासगी रुग्णालयांत पाहणी औरंगाबाद : पीएम केअर फंडातून प्राप्त झालेल्या व्हेंटिलेटर्सची ...
नादुरुस्त व्हेंटिलेटर्स दुरुस्तीचा खटाटोप
व्हेंटिलेटर्सची चाचणी : घाटीपाठोपाठ खासगी रुग्णालयांत पाहणी
औरंगाबाद : पीएम केअर फंडातून प्राप्त झालेल्या व्हेंटिलेटर्सची दिल्लीवरून आलेल्या वरिष्ठ डाॅक्टरांकडून गेल्या तीन दिवसांपासून पाहणी सुरू आहे. घाटीपाठोपाठ आता खासगी रुग्णालयांतील व्हेंटिलेटरचीही पाहणी केली जात आहे. ही पाहणी सुरू असताना नादुरुस्त व्हेंटिलेटर्स दुरुस्त करण्याचा खटाटोपही सुरू आहे.
घाटी रुग्णालयात गुरुवारी सकाळी आलेल्या दिल्लीतील वरिष्ठ डाॅक्टरांनी दिवसभर व्हेंटिलेटरच्या स्थितीची पाहणी केली. घाटीतील डाॅक्टरांकडून व्हेंटिलेटरची स्थिती जाणून घेतली. व्हेंटिलेटरची पाहणी करताना काही व्हेंटिलेटर्सचे पार्ट बदलून ते रुग्णांसाठी चालू शकतात का, याचीही पडताळणी केली जात आहे. दुरुस्ती केलेल्या व्हेंटिलेटरची चाचणी घेतली जात आहे. यासाठी शुक्रवारी रात्रीपासून काही व्हेंटिलेटर्स चाचणीसाठी लावण्यात आलेले असल्याची माहिती घाटीतील सूत्रांनी दिली.
घाटी रुग्णालयाला केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या १५० पैकी काही व्हेंटिलेटर्स शहरातील ५ खासगी रुग्णालयांना देण्यात आलेली आहे. घाटीपाठोपाठ या खासगी रुग्णालयातील व्हेंटिलेटर्सचीही या वरिष्ठ डाॅक्टरांनी पाहणी सुरू केली आहे. व्हेंटिलेटर्स सुरू आहे, आतापर्यंत किती रुग्णांना वापरले, काय-काय अडचणी येत आहेत, याची माहिती या तज्ज्ञांकडून घेण्यात येत आहे.
निर्णयाकडे लक्ष
ही समिती आतापर्यंतच्या स्थितीवरून व्हेंटिलेटर्सची पाहणी करून अहवाल देईल, असे घाटीतील डाॅक्टरांमध्ये चर्चा सुरू होती. परंतु, पाहणी सुरू होताना व्हेंटिलेटर दुरुस्त करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. व्हेंटिलेटर्ससंदर्भात ७ जूनला सुनावणी होणार आहे. त्यामुळे केंद्राकडून मिळालेल्या व्हेंटिलेटर्ससंदर्भात काय निर्णय होतो, याकडे घाटीसह खासगी रुग्णालयांतील डाॅक्टरांचे लक्ष लागले.