...तर लाखो जण पोलिस भरतीपासून राहणार वंचित, युवकांचा सरकारवर रोष

By सुमित डोळे | Published: November 29, 2023 04:32 PM2023-11-29T16:32:18+5:302023-11-29T16:33:53+5:30

हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा निघणार

...While lakhs of people will be deprived of police recruitment, youths are angry with the state government | ...तर लाखो जण पोलिस भरतीपासून राहणार वंचित, युवकांचा सरकारवर रोष

...तर लाखो जण पोलिस भरतीपासून राहणार वंचित, युवकांचा सरकारवर रोष

छत्रपती संभाजीनगर : गेल्या ३ वर्षांपासून पोलिस भरती रखडली. भरतीबाबत सरकारच्या घोषणेकडे राज्यातील लाखो विद्यार्थी आस लावून आहेत. मध्यंतरी प्रशासनाकडून दोन वर्षे कमाल वयोमर्यादा देखील वाढवली गेली; परंतु त्या निर्णयानुसार डिसेंबरआधी पोलिस भरतीसाठी अर्ज घेतले नाही तर लाखो उमेदवार या भरतीपासून वंचित राहण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी महिन्याभरात ४० पेक्षा अधिक लोकप्रतिनिधींच्या कार्यालयाचे उंबरे झिजविले; मात्र तरीही शासनाला फरक पडत नसल्याने तरुणांमधून सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे.

२०१९ मध्ये पोलिस भरतीची घोषणा झाली आणि कोराेनामुळे राज्यातील भरती प्रक्रिया थांबविण्यात आली. ती रखडलेली भरती २०२१ मध्ये पार पडली. त्यानंतर पोलिस दलात १८ हजार पदांसाठी भरती सुरू केल्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. राज्यात प्रशिक्षण सुविधा पुरेशी नसल्याने पोलिस भरतीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. मात्र, त्यानंतर पोलिस भरतीबाबत अधिक संभ्रम पसरला.

२०२१ नंतर गत दोन वर्षांची भरतीबाबत अद्याप शासनाकडून कुठलीच हालचाल नाही. सामान्य प्रशासन विभागातर्फे मार्चमध्ये दोन वर्षे कमाल वयाेमर्यादा वाढवून देण्यात आली. त्यानुसार ३१ डिसेंबर, २०२३ च्या पूर्वी पोलिस भरती जाहिरात काढून अर्ज भरून घेणे अपेक्षित आहे. नसता लाखो उमेदवार पोलिस भरतीपासून वंचित राहतील, असे निवेदनात म्हटले आहे. महिनाभरापासून राज्यात ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींना भेटून हे निवेदन देत आहोत; परंतु अद्यापही काहीच ठोस निर्णय नाही, असे पोलिस भरतीची तयारी करणारा महेश भोसलेने सांगितले. तर माझ्यासारख्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ही स्वप्न पूर्ण करण्याची शेवटची संधी आहे, असे निराशपणे अभिजित म्हस्के याने सांगितले.

नागपूरमध्ये रोष दिसणार
राज्यातून पोलिस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी एकवटत आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनात १५ डिसेंबर रोजी हजारोंच्या संख्येने नागपूरमध्ये जमा होऊन मागणी लावून धरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यापूर्वी झालेली भरती
वर्ष भरती संख्या

२०१६ - ४३००
२०१७ -१७१७
२०१८ - ३२८७
२०१९ - ३३५७ (२०२१ मध्ये पार पडली)
२०२१ -१८, ३३१ (२०२२ मध्ये पार पडली)

Web Title: ...While lakhs of people will be deprived of police recruitment, youths are angry with the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.