राममंदिराचे स्वप्न साकारत असताना ठाकरे गटाकडून दुधात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न

By बापू सोळुंके | Published: December 25, 2023 08:11 PM2023-12-25T20:11:50+5:302023-12-25T20:12:02+5:30

शिवसेना प्रवक्ते संजय सिरसाट यांची टीका

While realizing the dream of Ram Mandir, the Thackeray group tried to spoil the things : Sanjay Shirsat | राममंदिराचे स्वप्न साकारत असताना ठाकरे गटाकडून दुधात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न

राममंदिराचे स्वप्न साकारत असताना ठाकरे गटाकडून दुधात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर : अयोध्येत राममंदिर व्हावे, हे कोट्यवधी भाविकांचे स्वप्न आहे. २२ जानेवारी रोजी हे स्वप्न साकारत असताना आपले प्रतिनिधित्व दिसावे, यासाठी ठाकरे गटाकडून दुधात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ता आ. संजय सिरसाट यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

राम मंदिर ही भाजपची खासगी प्राॅपर्टी नाही, असे विधान शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर आ. सिरसाट यांनी सोमवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, केवळ मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिनिधित्व दिसावे, यासाठी हा अट्टाहास त्यांच्याकडून करण्यात येत आहे. शिवसेना उबाठा गटाचे खा. राऊत यांनी आघाडीबद्दल वक्तव्य केले की, अजितदादांच्या कुबड्या घेऊन भाजप वाढणार आहे. हे तर शरद पवारांचा टेकू घेऊनच आहेत ना? वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे, याकडे तुम्ही कसे पाहता, असे विचारले असता आ. सिरसाट म्हणाले की, ठाकरे हे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती झाल्याचे बोलून त्यांना झुलवत ठेवत आहेत. हे आता त्यांच्या लक्षात आले आहे. ते जर महायुतीमध्ये आले तर शिंदे गट त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकेल.

जरांगे यांना मुंबईत येण्याची गरज भासणार नाही
मनोज जरांगे-पाटील यांनी कोट्यवधी मराठा बांधवांसह जाणार असल्याचे जाहीर केले आहे, हे एक प्रकारे मुख्यमंत्र्यांसाठी संकट आले असे वाटते का, असे विचारले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री संकटाचा सामना करणारे नेते आहेत. परंतु, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी ते करीत असलेले काम उत्तम आहे. आज लाखो लोकांच्या कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. जरांगे यांना मुंबईत येण्याची गरज भासणार नाही, असा आपल्याला विश्वास आहे.

ठाकरेंनी दिलेल्या एक कोटीत सर्व आमदारांचे योगदान
राम मंदिरासाठी एक कोटी रुपये दिल्याचा गवगवा ठाकरे गटाकडून केला जात आहे. परंतु, या एक कोटीमध्ये प्रत्येक आमदाराचे एक लाख रुपये आहेत.

Web Title: While realizing the dream of Ram Mandir, the Thackeray group tried to spoil the things : Sanjay Shirsat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.