अतिक्रमण काढताना महापालिका पथक अन् पोलिसांवर दगडफेक,अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या
By सुमित डोळे | Published: February 21, 2024 12:23 PM2024-02-21T12:23:08+5:302024-02-21T12:24:15+5:30
विश्रांतीनगर येथे मागील काही दिवसांपासून अतिक्रमण वाढत होते.
छत्रपती संभाजीनगर: मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन जवळील विश्रांतीनगर येथील अतिक्रमण हटविताना आज सकाळी राडा झाला. महापालिका आणि पोलिसांच्या पथकावर नागरिकांनी अचानक दगडफेक केल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या सात ते आठ नळकांड्या फोडल्या. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून सर्व अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांती नगरमध्ये महापालिका, पोलीस आणि नागरिकांमध्ये अतिक्रमण हटविण्यावरून आज सकाळी दहा ते अकरा वाजेदरम्यान वाद झाला. मागील अनेक दिवसांपासून या परिसरात अतिक्रमण करण्यात आले आहे. अतिक्रम काढण्यासाठी महापालिकेने काही दिवसांपूर्वी नोटिसा बजावल्या. त्यानंतर आज सकाळी महापालिका पथक पोलिसांसह या ठिकाणी अतिक्रमण हटविण्यासाठी गेले. सुरुवातीला महापालिका पथकाने अतिक्रमण धारकांना कारवाईची माहिती दिली. त्यानंतर अनाउंसमेंट करण्यात आली. अतिक्रमण काढण्यास सुरुवात होताच अचानक नागरिकांनी विरोध करत प्रथम महापालिका पथक आणि त्यानंतर पोलिसांनावर दगडफेक सुरू केली.
पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
नागरिकांनी कारवाईला विरोध करत पथकावर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत जमावाला पांगविले. त्यानंतर पथकाने जेसीबीच्या माध्यमातून अतिक्रमण उध्वस्त केले आहे. सध्या परिस्थिति नियंत्रणात असून घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. दगडफेकीत आठ पोलिस कर्मचारी, पोलिस निरीक्षक राजेश यादव जखमी झाले आहेत.