३० हजाराची लाच घेताना गंगापुरच्या फौजदारासह खाजगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 07:32 PM2019-07-03T19:32:11+5:302019-07-03T19:33:13+5:30
गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी घेतली लाच
औरंगाबाद: गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका जणाकडून खाजगी व्यक्तीमार्फत तीस हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यातील फौजदाराला लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. याविषयी गंगापुर ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
फौजदार गजेंद्र तुळशीराम इंगळे आणि खाजगी व्यक्ती समीर नासीर पठाण (वय २९,रा. मन्सुरी कॉलनी, गंगापुर)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गंगापुर पोलीस ठाण्यात कार्यरत फौजदार इंगळे यांनी एका प्रकरणात चौकशीसाठी तक्रारदार यांना २८ जून रोजी ठाण्यात बोलावले होते. तक्रारदार हे गंगापुर ठाण्यात गेले तेव्हा त्यांनी संबंधित प्रकरणात आरोपी न करण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार यांना ३० हजार रुपये लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी इंगळेविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार नोंदविली.
या तक्रारीनुसार ३ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन सरकारी पंच पाठवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हा फौजदार इंगळे यांनी तक्रारदार यांच्याकडे पुन्हा लाचेची रक्कम मागून ही रक्कम समीर पठाणकडे देण्याचे सांगितले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पठाणने लाचेची रक्कम घेण्याची तयारी दर्शविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या साध्या वेशातील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याजवळील न्यू जनता हॉटेलसमोर सापळा रचला. फौजदार इंगळे यांनी सांगितल्यानुसार समीर हा तेथे आला आणि त्याने लाचेचे ३० हजार रुपये तक्रारदार यांच्याकडून घेतले. समीरने लाच घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला लाचेच्या रक्कमेसह पकडले. यानंतर लगेच गंगापुर ठाण्यातून फौजदार इंगळे यांनाही ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बी.व्ही.गावडे, उपअधीक्षक सुजय घाटगे, कर्मचारी संदीप आव्हाळे, भिमराज जिवडे, अश्वलिंग होनराव, संतोष जोशी यांनी केली.