पाच हजारांची लाच घेताना आरेखक जेरबंद
By Admin | Published: April 17, 2016 01:23 AM2016-04-17T01:23:32+5:302016-04-17T01:35:01+5:30
औरंगाबाद : पेट्रोलपंपाच्या प्रस्तावावर शिफारस करून तो प्रस्ताव मुख्य अभियंत्यांकडे पाठविण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना
औरंगाबाद : पेट्रोलपंपाच्या प्रस्तावावर शिफारस करून तो प्रस्ताव मुख्य अभियंत्यांकडे पाठविण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना मुख्य आरेखक रघुनाथ पदमे (५७, रा. न्यू हनुमाननगर, गल्ली नं. ३, एन-४, पाण्याच्या टाकीजवळ) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (दि.१६) अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ येथे करण्यात आली.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, तक्रारदार यांना इंडियन आॅईल कार्पोरेशन लि. कंपनीकडून पेट्रोलपंप मंजूर झालेला आहे. त्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, औरंगाबाद यांना पाठविण्यात आला. त्यांच्या कार्यालयातील मुख्य आरेखक रघुनाथ पदमे याने या प्रस्तावावर शिफारस करून तो पुढे पाठविण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने १६ एप्रिल रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. पदमे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यावर सार्वजनिक बांधकाम मंडळ, अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला. शनिवारी दुपारी २.४० वाजता रघुनाथ पदमे याला पंचांसमक्ष पाच हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक विवेक सराफ, के. के. शिंदे, कर्मचारी कैलास कामठे, श्रीराम नांदुरे, संदीप आव्हाळे, अश्वलिंग होनराव, अजय आवले, दिलीप राजपूत यांनी केली.