‘मॅडम’साठी १० हजार तर स्वत:साठी दोन हजार घेताना हवालदार एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 11:44 AM2022-05-20T11:44:10+5:302022-05-20T11:50:23+5:30
गुटखा विक्रेत्यांकडून लाच प्रकरणात दौलताबादच्या महिला पोलीस निरीक्षकावर गुन्हा
औरंगाबाद : दौलताबाद पोलीस ठाण्यात दोन महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या महिला पोलीस निरीक्षकाने गुटखा विक्रेत्याकडे दरमहा २५ हजार रुपये हप्त्याची मागणी करून तडजोडीअंती १० हजार रुपये घेण्याची तयारी दर्शविली. रजेवर असलेल्या या पी.आय. मॅडमसाठी १० हजार रुपये आणि स्वत:चे २ हजार अशी एकूण १२ हजार रुपयांची लाच घेताना पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी गुरुवारी दुपारी दौलताबादेत रंगेहाथ पकडले.
पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ आणि पोलीस हवालदार रणजीत सहदेव शिरसाट अशी आरोपींची नावे आहेत. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रारदार तरुणाने दोन महिन्यांपूर्वी चोरट्या मार्गाने गुटखा विक्री सुरू केली. हे दौलताबाद पोलिसांना समजले. यानंतर एका हवालदाराने गुटखा विक्रेत्याला ठाण्यात बोलावून घेतले होते आणि त्याची भेट मिसाळबाईंशी करून दिली होती. तेव्हा त्यांनी त्याला दोन दिवसांनंतर ये, असे सांगितले. त्यांचा उद्देश समजल्याने त्याने एसीबी कार्यालयात तक्रार नोंदविली.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रेकॉर्डरसह त्याला २४ मार्च रोजी दौलताबाद ठाण्यात पाठविले. तेव्हा हवालदार रणजीत त्याला भेटला आणि त्याला घेऊन मिसाळ यांच्या केबिनमध्ये गेला. यावेळी तक्रारदारासोबत एसीबीचा पंचही होता. मिसाळ यांनी हा कोण आहे, असे विचारले तेव्हा तो गुटख्याचा होलसेल डीलर असल्याचे तरुणाने सांगितले. मिसाळ यांच्या सांगण्यावरून रणजीतने दोघांची झडती घेतली. मात्र त्यांच्याजवळील रेकॉर्डर त्याच्या हाती लागले नाही. यावेळी दरमहा २५ हजार रु. हप्ता आणि एक केस केली जाईल, असे बजावले. तेव्हा नव्यानेच व्यवसाय सुरू केल्याने एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे तक्रारदाराने सांगितले. तडजोडीअंती त्याने दहा हजार हप्ता घेण्याची तयारी दर्शविली.
हवालदार म्हणाला, वेगळे दोन हजार माझे
केबिनमधून बाहेर आल्यानंतर सिरसाट म्हणाला की, आम्ही गरीब आहोत, वेगळे दोन हजार माझे असतील. दोन-तीन दिवसांत आणून देतो, असे सांगून तक्रारदार ठाण्यातून बाहेर पडला.
आजी वारल्यामुळे गावाला गेल्याने लांबला ट्रॅप
यानंतर चार दिवसांत तक्रारदाराची आजी वारल्याने ते गावी गेले. दरम्यान, सिरसाटने त्यांच्याकडे तगादा लावला. गुरुवारी मॅडम रजेवर आहेत. दोघांचे मिळून १२ हजार रुपये घेऊन सिरसाटने त्यास बोलावले. लाच घेताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पोलिसांनी त्यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक मारोती पंडित, पोलीस निरीक्षक एन.एच. क्षीरसागर, हवालदार राजेंद्र जोशी, प्रकाश घुगरे, चांगदेव बागूल आणि आशा कुंटे यांनी केली. हवालदारास अटक केली असून रजेवरील ‘मॅडम’चा शोध सुरू आहे.