बैल धुताना पाझर तलावात शेतकरी बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:02 AM2021-09-08T04:02:11+5:302021-09-08T04:02:11+5:30
करंजखेड : कन्नड तालुक्यातील रामपूरवाडी येथे पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेला शेतकरी पाझर तलावात बुडाला. ही घटना सोमवारी सकाळी ११ ...
करंजखेड : कन्नड तालुक्यातील रामपूरवाडी येथे पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेला शेतकरी पाझर तलावात बुडाला. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजेदरम्यान घडली. बुडालेल्या शेतकऱ्याचा शोध घेण्याचा स्थानिक तरुण, पोलिसांसह अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, शोध न लागल्याने शेवटी धुळ्याहून एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. विलास काशीनाथ जंजाळ (३२) असे शेतकऱ्याचे नाव आहे.
रामपूरवाडी येथील शेतकरी विलास जंजाळ हे सोमवारी पोळा सण असल्यामुळे जवळ असलेल्या पाझर तलावात गाय व बैल धुण्यासाठी सकाळी ११ वाजेदरम्यान गेले हाेते. बैल धूत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडाले. ही बाब गावकऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलिसांनाही कळविण्यात आले. पोनि. हरीशकुमार बोराडे, पोलीस कर्मचारी लालचंद नागलोत, दिनेश खेडकर, सतीश देवकर, एस. एम. पठाण हे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तलावात जंजाळ यांचा शोध सुरू केला. सोमवारी रात्रीपर्यंत शोध न लागल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मंगळवारी अग्निशमनच्या अजीम पठाण यांच्या पथकाने सकाळपासून शोध सुरू केला. मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यांनाही यश मिळाले नाही. ऐन पोळ्याच्या दिवशीच ही घटना घडल्याने रामपूरवाडी गावावर शाेककळा पसरली. विलास जंजाळ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आहेत.
चौकट
शोध लागत नसल्याने एनडीआरएफच्या पथकाला पाचारण
स्थानिक तरुण, पोलीस, अग्निशमन दलाकडून बुडालेल्या शेतकऱ्याचा सोमवारी व मंगळवारी शोध लागला नाही. तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार मोनाली सोनवणे, मंडळ अधिकारी देशपांडे यांनी घडनास्थळाला भेट दिली. मृतदेह सापडत नसल्यामुळे शेवटी धुळे येथील स्पेशल एनडीआरएफच्या पथकाला तपासकामी पाचारण करण्यात आले आहे.
फोटो :
विलास जंजाळ २) कन्नड तहसीलदार संजय वारकड व नायब तहसीलदार मोनाली सोनवणे पाहणी करताना.