काम सुरू असताना विहीर ढासळली; तीन मजुरांचा दबून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 01:38 PM2023-04-04T13:38:48+5:302023-04-04T13:39:12+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घटना; मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ
गारज (जि. छत्रपती संभाजीनगर) : झोलेगाव (ता. वैजापूर) शिवारात विहिरीचे काम सुरू असताना अचानक विहीर ढासळून त्याखाली मजूर दाबले गेले. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडला. सर्व मृत हे राजस्थान राज्यातील असून, त्यात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. सीतारामसिंग रावत (२५), महावीरसिंग रावत (३८, दोघे रा. जिवाना, राजस्थान) व बनाजी गुजर (३५, रा. धोरंदाखेडा, भिलवाडा, राजस्थान) अशी मृतांची नावे आहेत.
बायगाव येथील आसराबाई साहेबराव करंडे यांच्या शेतात नवीन विहिरीचे काम पंधरा दिवसांपासून सुरू आहे. राजस्थान येथील मजूर हे काम करीत होते. ४९ फूट खोल खोदकाम पूर्ण होत आले होते. सोमवारी विहिरीत उतरून पाच मजूर काम करीत होते. तेव्हा दुपारी अचानक विहीर ढासळून मोठमोठे दगड व मातीचा ढिगारा त्यांच्या अंगावर पडला. यामध्ये सीतारामसिंग रावत, महावीरसिंग रावत या दोन सख्ख्या भावांसह बनाजी गुजर या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर छोटू भिल्ला (२५), रतनसिंग रावत (२५, दोघेही रा. जिवाना) हे दोघे जखमी झाले आहेत. पोकलेनच्या साहाय्याने तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. त्यानंतर ते त्यांच्या गावी पाठविले जाणार आहेत.\