कुजबूज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:04 AM2021-06-27T04:04:02+5:302021-06-27T04:04:02+5:30

शहरातील एका चौकात ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपचे आंदोलन झाले. राज्य सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी झाली. रास्ता रोकोचाही प्रयत्न झाला. ...

Whisper ... | कुजबूज...

कुजबूज...

googlenewsNext

शहरातील एका चौकात ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपचे आंदोलन झाले. राज्य सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी झाली. रास्ता रोकोचाही प्रयत्न झाला. महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आजूबाजूचे तीन-चार जण नसती झंझट नको, म्हणून बाजूला झाले. एक जण म्हणाला, आंदोलनात सहभागी होण्याची माझी एका वर्षातील तिसरी वेळ आहे. दुसरा आपल्या मनातली खंत व्यक्त करताना म्हणाला, सरकार काही पडत नाही, आणखी किती वर्षे आंदोलन करावे लागते माहीत नाही? त्याच्या या वाक्याने सर्वांचेच चेहरे प्रश्नार्थक झाले.

‘पाणीदार’ नेता कोण?

राज्य शासनाने नुकताच २४५ कोटी रुपयांचा निधी जाहीर करून मराठवाडा वॉटर ग्रीडचे काम सुरू असल्याचे जाहीर केले. मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी महाविकास आघाडीचे सरकार अनुकूल नाही, अशी टीका होत असतानाच सरकारने ही रक्कम जाहीर करून विरोधकांची तोंडे बंद करण्याचा प्रयत्न केला. माजी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या काळात ही योजना जाहीर झाली होती. त्यामुळे ते या प्रश्नावर काही बोलण्याच्या आधीच पैठणचे नेते आणि आजी मंत्री संदीपान भुमरे यांनी २४५ कोटींची ही योजना केवळ पैठण तालुक्यासाठीच असल्याचे स्पष्ट करून आपण ‘पाणीदार’ नेता असल्याचे दाखवून दिले.

गराड्यामागचे रहस्य

काही दिवसांपूर्वी एक मंत्री मुंबईहून औरंगाबाद दौऱ्यावर आले. यावेळी त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांनी गराडा घातला. हारतुरे, पुष्पगुच्छांचा वर्षाव झाला. मंत्र्यांनी यापूर्वीही लॉकडाऊन असतानाच्या काळात दौरे केले होते. मात्र, त्यावेळी औरंगाबादमध्ये कोरोनाची रुग्णसंख्याही वाढलेली होती. त्यामुळे मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते. आता अनलाॅक झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी गर्दी केली असेल असेच सर्वांना वाटले. मात्र, मंत्र्यांभोवती मोहोळ जमण्याचे कारण वेगळेच होते. राज्यातील विविध महामंडळांच्या नियुक्त्या होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या महामंडळावर आपली वर्णी लागावी यासाठी कार्यकर्त्यांनी मोठा उत्साह दाखविल्याचे रहस्य नंतर उघड झाले.

Web Title: Whisper ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.