कुजबुज... काहीच नको रे बाबा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:04 AM2021-08-01T04:04:22+5:302021-08-01T04:04:22+5:30
पुण्यातील एका महिला अधिकारी आणि पोलीस हवालदार यांच्यातील ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर नुकतीच व्हायरल झाली. हद्दीतील हॉटेलचालकाला पैसे न देता ...
पुण्यातील एका महिला अधिकारी आणि पोलीस हवालदार यांच्यातील ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर नुकतीच व्हायरल झाली. हद्दीतील हॉटेलचालकाला पैसे न देता बिर्याणी आणि प्रॉन्स आणण्याची ऑर्डर त्या देतात. त्यांच्या या क्लिपची पोलीस दलात जोरदार चर्चा सुरू असून, औरंगाबादेतील अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी त्या घटनेची धास्ती घेतल्याचे जाणवत आहे. शनिवारी एका पोलीस ठाण्यातील अधिकारी सकाळपासून बंदोबस्ताच्या कामात व्यग्र होते. बंदोबस्ताचे काम आटोपून ते सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास ठाण्यात आले. तेव्हा ठाण्यात अगोदरच उपस्थित पत्रकारांनी काही विचारण्याअगोदरच ‘सकाळपासून काहीच खालले नाही. फार थकलो रे बाबा. थोडं थांब’, असे ते म्हणाले. त्यावेळी एका पत्रकाराने ‘तुमच्या हद्दीतील हॉटेलमधून बिर्याणी मागवा साहेब’, असा सल्ला दिला. तेव्हा साहेबांनी लगेच हात जोडले आणि ‘नको रे बाबा... घरी जाऊनच जेवलेले बरे’, अशी सावध भूमिका घेतली. दरम्यान, ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये ‘साहेबांनी पुण्याची ती घटना चांगलीच मनाला लावून घेतली वाटतं’, अशी कुजबुज सुरू केली.