सीटी गेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:02 AM2021-07-24T04:02:56+5:302021-07-24T04:02:56+5:30
जिल्हा परिषदेच्या हजारो शाळांतून लाखो विद्यार्थी शिकतात. त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी शासन, प्रशासन, शिक्षक विविध अभिनव उपक्रम राबवितात. त्यामुळे खेड्यापाड्यातील ...
जिल्हा परिषदेच्या हजारो शाळांतून लाखो विद्यार्थी शिकतात. त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी शासन, प्रशासन, शिक्षक विविध अभिनव उपक्रम राबवितात. त्यामुळे खेड्यापाड्यातील वाडीवस्तीवरील मुलेही यशाची शिखरे गाठतात. मात्र, त्याचा कुठेही गवगवा होत नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांत शिकणाऱ्या मुलांत कुठेतरी इथे शिकण्याचा न्यूनगंड जाणवतो. तो नाहीसा करून मुलांचे मनोबल वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी माजी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
जिल्हा परिषद आपल्या शाळांचा, शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी मेहनत घेत असते. परंतु येथे शिक्षणाऱ्या मुलांना साधनांच्या कमतरतेबरोबरच आणखी एका गोष्टीची कमतरता जाणवते. ती म्हणजे आत्मविश्वास आणि या न्यूनगंडाचे महत्त्वाचे कारण म्हणजे जिल्हा परिषद शाळांचा कोणताही ब्रँड नाही. या शाळात शिकून आयुष्यात यशस्वी झालेल्यांची कोणतीही जाहिरात नाही. आपण जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षणाची सुरुवात करून आयुष्यात जे यश मिळविले ते आमच्या मुलांसोबत शेअर करून त्यांचा आत्मविश्वास वाढवायला मदत करा. आपले हे पाऊल अनेक मुलांच्या आयुष्यात गुणात्मक बदल करू शकेल, असा विश्वास डाॅ. गोंदावले यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून यशस्वी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा लोकसहभाग कसा मिळवता येईल. मुलांचे मनोबल शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी काय करता येईल. त्यात लोकसहभाग काय असेल यासंबंधी https://forms.gle/bHdorq2XpxmuTvDb7 या लिंकवर माहीती भरा आम्ही आपल्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत, असे आवाहन करून राज्यात एक वेगळा प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या वर्षी साडेचार हजार विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या २१३१ शाळांत वाढले. यावर्षी इंग्रजी, खासगी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या शाळांत प्रवेशाचा हा आकडा यावर्षी दहा हजार पार जाण्याची शक्यता शिक्षण विभागाने व्यक्त केली. सुंदर माझी शाळा, शाळांत डेन्सफाॅरेस्ट यासह विविध उपक्रमशील शिक्षकांना प्रोत्साहन दिल्याने झेडपी लाइव्हसह वेगवेगळ्या उपक्रमांतून औरंगाबादची वेगळी ओळख जिल्हा परिषदेचे शिक्षक करत आहेत. मूलभूत सोयी-सुविधा वाढविण्यावर भर दिल्याने शाळांचा चेहरामोहरा बदलत आहे. विद्यार्थी गुणवंत असताना या शाळांचे शिक्षणाचे ब्रॅण्डिंग करण्यात त्यांनी देश विदेशात पसरलेल्या जिल्हा परिषद शाळांतून शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांना साद घातली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली आहे. तो प्रतिसाद जिल्हा परिषद शाळांचे ब्रॅण्डिंग तर करेल शिवाय विद्यार्थ्यांचेही मनोबलही वाढवेल, असा डाॅ. गोंदावले यांना विश्वास आहे. कोरोनाच्या महामारीतून सावरताना जिल्हा परिषदेच्या शाळांकडेही सीईओंनी लक्ष घातल्याने आता शिक्षकांतही वेगवेगळ्या उपक्रमांसाठी, गुणवत्ता वाढीसाठी उत्साह संचारल्याचे दिसत आहे. भौतिक सुविधांची वाढ लोकसहभागातून शक्य असल्याची आदर्श उदाहरणेही त्यांनी निर्माण केल्याने सुंदर माझी शाळा उपक्रमात लोकसहभाग वाढल्याने शाळांच्या सुविधा वाढून रूपही बदलत आहे.
---
-डाॅ. मंगेश गोंदावले,
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद औरंगाबाद