Drought In Marathwada : पांढऱ्या सोन्याला माहेरातच सासरवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:45 PM2018-10-17T12:45:50+5:302018-10-17T13:21:00+5:30

दुष्काळवाडा : पावसानेच दगा दिल्याने आता आशा तरी कुणाकडून करायची, या चिंतेत शेतकरी आहेत. हे भयावह चित्र आहे वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावचे. 

White gold suffers in his homeland | Drought In Marathwada : पांढऱ्या सोन्याला माहेरातच सासरवास

Drought In Marathwada : पांढऱ्या सोन्याला माहेरातच सासरवास

googlenewsNext

- मोबीन खान, खंडाळा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद 

यंदा दुष्काळाने संकटांचा डोंगर उभा केल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पिकांची झालेली हानी, बेताची आर्थिक परिस्थिती, चाराटंचाई, पाणीटंचाई यामुळे दुष्काळाशी दोन हात करताना बळीराजा कोलमडून गेला आहे. पावसानेच दगा दिल्याने आता आशा तरी कुणाकडून करायची, या चिंतेत शेतकरी आहेत. हे भयावह चित्र आहे वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावचे. 

पांढऱ्या सोन्याचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वैजापूर तालुक्यावर यंदा दुष्काळाची गडद  छाया आहे. संपूर्ण पावसाळा संपला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. आणेवारी जाहीर झाल्यानंतर खंडाळा गावाची पाहणी केली तेव्हा अतिशय विदारक स्थिती समोर आली. ज्या गावातून दरवर्षी पांढऱ्या सोन्यावर कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते, त्याच गावचे शेतकरी यंदा आर्थिक संकटात आहेत. सुमारे १८ हजार लोकवस्तीच्या गावात मतदारांची संख्या ८ हजार असून, परिसरातील शेतजमीन ३ हजार ७८७ हेक्टर आहे. येथील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. येथील शेतकरी प्रामुख्याने दरवर्षी कांदे व कापसावरच सर्वाधिक सट्टा खेळतात. मात्र, यंदा सगळ्याच पिकांची वाट लागली. 

यावर्षी खंडाळ्यात २४० मि.मी. पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत तो ४५ टक्के बरसला. यावर्षी खरीप हंगामात कापूस, तूर, मूग, बाजरी, मक्याची पेरणी केली. मात्र, पावसाअभावी हातातोंडाशी येणारा थोडाफार घासही निसर्गाने हिरावला आहे. तलाव व विहिरींनी तळ गाठला असून, पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. पावसाअभावी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी आहे, तसेच खरीप हंगामातील बाजरी, मका, चाऱ्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

जून, जुलै महिन्यात १,००० ते १,५०० रुपये शेकडा मिळणाऱ्या पेंढीची किंमत ३,००० ते ३,३०० रुपये शेकडा झाली आहे. हा चारादेखील जवळपासच्या परिसरात विक्रीसाठी उपलब्ध नसल्यामुळे, भुसकट व उपलब्ध कडब्यावर जनावरे जगवण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे. या परिसरात खरीप हंगामातील बाजरी, मक्याचे उत्पन्न कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच चाऱ्याची जमवाजमव सुरू केली आहे. चाऱ्यासाठी बाजरी, मका या पिकांची सोंगणी मोफत करून शेतमालकाला एकरी हजार रुपये द्यावे लागत आहेत. 

तिन्ही प्रकल्प कोरडेठाक
येथे पाणी साठवण करण्यासाठी बिलोनी, कोल्ही आणि पानगव्हाण लघु प्रकल्प आहे. मात्र, हे तिन्ही प्रकल्प यंदा भर पावसाळ्यात कोरडे आहेत. ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती बघून गावातील वाड्या-वस्त्यांवर पंचायत समितीने ३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला होता. मात्र, टँकरचे पाणी ग्रामस्थांपर्यंत न पोहोचता गावपुढाऱ्यांच्या विहिरीत शेतीसाठी वापरले जात असल्याचे समोर आल्याने हे टँकर बंद झाले. या प्रकरणाची गटविकास अधिकारी चौकशी करीत आहेत. 

जनावरांच्या विक्रीशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही
यंदा पावसाळ्यात दुष्काळी परिस्थितीने कहर केला आहे. त्यामुळे शेतकरी जनावरे बाजारात घेऊन जात आहेत. त्यांचे दर मात्र निम्म्यावर आले आहेत. विशेष म्हणजे या जनावरांना शेतकरी ग्राहक नाहीत, तर बाहेरचे व्यापारी आहेत, ते येथून स्वस्तात जनावरांची खरेदी करून ती इतर राज्यांमध्ये चढ्या दराने विकत आहेत. शेतकऱ्यांनाही जनावरांची विक्री करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

पावसाची मागील ५ वर्षाची सरासरी :

२०१३ - ४१४ मिमी 

२०१४ - ६५८ मिमी 

२०१५ - ५६५ मिमी

२०१६ - ५२३ मिमी 

२०१७  - ६२७ मिमी 

२०१८ - २६९ मिमी 

१० पैकी ७ मंडळातील ७० टक्के पिके गेली
तालुक्यात दहा महसूल मंडळे असून त्यापैकी ७ मंडळातील जवळपास ७० टक्के खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे या आठवड्यात तातडीने उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
- अनिल कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी, वैजापूर

बळीराजा काय म्हणतो?
- कधी दुष्काळ, कधी लाल्या रोगाचा फेरा तर कधी बोंडअळीचा प्रादुर्भाव अशा संकटांनी शेतकरी खचला आहे. हाती कोणतेच पीक लागत नसल्याने नैराश्य आले आहे. - कचरू जेजूरकर 

- दुष्काळाच्या या दुष्टचक्रामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हे वास्तव आताचे नाही, तर मागील दोन वर्षांपासूनचे आहे. सतत दोन वर्षे खरीप पिकांना दुष्काळाचा फटका बसला आहे. पावसाचा खंड पडल्याने पिके सुकली असून बळीराजा डोळ्यांत अश्रू घेऊन परतीच्या पावसाची आस लावून बसला आहे. - आजम खान 

- शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा व जनावरांच्या छावण्या सुरू कराव्यात, अन्नधान्याचा पुरवठा करावा व सरसकट दुष्काळी अनुदान द्यावे. -सूरज पवार 

- पिण्यासाठी, जनावरांसाठी, फळबागा जगविण्यासाठी जवळपास हजारो रुपयांचे पाणी विकत घ्यावे लागले. नव्या फळबागाही जळाल्या. - साजीद खान 

- पावसाची आशा धूसर झाली असून शेतकऱ्याला चार पैसे मिळवून देणारा तसेच वर्षभर पुरेल एवढे धान्य, कडधान्य देणारा हा खरीपाचा संपूर्ण हंगाम वाया गेला आहे. चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे - संजय सूर्यवंशी

Web Title: White gold suffers in his homeland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.