पांढऱ्या सोन्यावर बळीराजाचा पुन्हा ‘सट्टा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:35 AM2018-07-05T00:35:01+5:302018-07-05T00:35:26+5:30
मका, मूग, बाजरीत घट : तालुक्यात ६० टक्के पेरणी; नुकसान होऊनही कपाशीचा पेरा वाढला
मोबीन खान
वैजापूर : तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात ८१ हजार २२ हेक्टर (६० टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी बोंडअळीमुळे तालुक्यातील शंभर टक्के कपाशीचे क्षेत्र उद्ध्वस्त झाले होते. त्यामुळे कपाशीच्या पेºयात मोठी घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, तसे न होता बळीराजाने पांढºया सोन्यावर पुन्हा सर्वाधिक सट्टा लावला आहे, तर मका, मूग, बाजरीच्या क्षेत्रात घट झाल्याची माहिती तालुका कृषि अधिकाºयांनी दिली.
तालुक्यात यंदा खरीपाचे सरासरी क्षेत्र १ लाख ३५ हजार ५६९ हेक्टर आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या पावसानंतर तसेच त्यानंतर पडलेल्या खंडानंतर आलेल्या पावसानंतर तालुक्यातील शेतकºयांनी पेरणी सुरू केली. ४ जुलैपर्यंत तालुक्यातील वैजापूर ( ९६७३), लासूरगाव (२३५२), लाडगाव (५९६८), महालगाव ( ९९५१ ), खंडाळा (१२९४१ ), शिऊर (१०१५०), गारज (६६५६), नागमठाण (२७५६), बोरसर (७८००), लोणी (१२७६४) अशा सर्व दहा महसुली मंडळात एकूण ८१ हजार २२ हेक्टरवर म्हणजेच सरासरी क्षेत्राच्या ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा कपाशीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मका, मूग, बाजरीच्या क्षेत्रात घट झाली आहे. कपाशीची लागवड ५१ हजार ६४८ हेक्टर, मक्याची २१ हजार १९८ हेक्टर, बाजरी ३ हजार २९३ हेक्टर, सोयाबीन २९३ हेक्टर, भुईमुग १३४७ हेक्टर, मूग १५२८ हेक्टर, उडीद ४३ हेक्टर, तूर २४४ हेक्टर पेरणी क्षेत्राचा समावेश आहे.
पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट
मृग नक्षत्राच्या सुरुवातीला बरसलेल्या जोरदार पावसाने आता मात्र दडी मारल्याने तालुक्यावर दुबार पेरणीच्या संकटाचे सावट आहे. तालुक्यात आतापर्यंत सुमारे ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, पावसाने ओढ दिल्याने ती वाया जाण्याचा धोका आहे. यामुळे तालुक्यातील चिंतातूर शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. पावसाअभावी अनेक मंडळातील पिकांनी माना टाकल्या आहेत. महालगाव, खंडाळा, शिऊर, लोणी मंडळात दुबार पेरणीशिवाय शेतकºयांपुढे दुसरा पर्याय नाही. तालुक्यात ६० टक्के पेरणी झाल्याची नोंद कृषि विभागाच्या दरबारी आहे. उर्वरित ४० टक्यांच्या ठिकाणी न झालेल्या पेरण्या आणि पाऊस रुसल्याने खुंटलेली पिकांची वाढ यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. गारज व लासूरगाव परिसरात पावसाअभावी पेरण्या ठप्प पडल्या आहेत.
धरणे अजूनही कोरडेच
तालुक्यात दहा ठिकाणी लघु व मध्यम प्रकल्प आहेत. मात्र पावसाला एक महिना उलटूनही बहुतांश धरणे मृत साठ्यातच जमा असल्याचे दिसते.
नारंगी सारंगी प्रकल्प, जरूळ लघु तलाव, गाढेपिंपळगाव, सटाणा, खंडाळा, बिलोणी, बोरदहेगाव, वांजरगाव हे लघु तलाव कोरडेच असून मन्याड साठवण तलावात ३४.३३ टक्के, कोल्ही मध्यम प्रकल्पात ७.३ टक्के पाणी आहे.
मंडळनिहाय झालेला पाऊस
वैजापूर -१०३ मि.मी.
खंडाळा -४८ मि.मी.
शिऊर -९६ मि.मी.
लोणी -५८ मि.मी.
गारज -४९ मि.मी.
नागमठाण -८० मि.मी.
बोरसर-६४ मि.मी.
महालगाव -१३१ मि.मी.
लाड़गाव -१०७ मि.मी.
लासूरगाव -६७ मि.मी.
पावसाने दडी दिल्याने तालुक्यात केवळ ६० टक्के पेरण्या झाल्या असून ४० टक्के पेरण्या थांबल्या आहेत. यंदा तालुक्यात शेतकºयांनी पुन्हा ५१ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करुन पांढºया सोन्यावर विश्वास दाखविला आहे.
-अनिल कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी